fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘मूर्ती आमची किंमत तुमची’ : राज ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात

पुणे : सध्या सगळीकडे सुंदर रंगानी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तींची किंमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची मूर्ती हवी. या गोष्टींचा विचार करीत पुण्यातील प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठेत हा उपक्रम राबविला आहे. उपक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गणरायाची आरती करून झाली. त्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच नागरिकांना गणेश मूर्ती देण्यात आल्या.

यंदा ७ हजार ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे. साईनाथ चकोर, हेमंत कंठाळे, नरेश देवकर, जीवन गायकवाड, विक्रम लगड, गौरव गवळी, भाई कात्रे, श्रीराज पवार, विकास गवळी यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

प्रल्हाद गवळी म्हणाले, कोविड काळापासून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हल्ली गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांना या मोठ्या मूर्ती घेणे शक्य होत नाही, पण मोठ्या मूर्ती घेण्याचा मुलांचा हट्ट असतो. यामुळे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोणाकडे पैसे नसतील तर विनामूल्य मूर्ती देखील देण्यात येते.

लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळेच्या १०१ विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांचे लाईव्ह चित्र यावेळी काढले. यावेळी आदिमाया ढोल ताशा पथक लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या पथकाने वादन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: