मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी ; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी – पंकजा मुंडे
औरंगाबाद : मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा.
त्यात अशी अप्रिय घटना घडायला नको होती. यापूर्वी मी मंत्री परळीत आंदोलन झालं होतं पण ते शांततेत झालं होतं. आम्ही जसं सभागृहात एखादा लोकप्रतिनिधी सांगतो की असं असं झालंय ते खरयं असं गृहीत धरून त्याबद्दल चौकशी करण्याचा एक नियम आहे तसंच एखादा नागरिक सांगतोय त्यातला त्यात एखादा आंदोलकर्ता सांगतोय की ते घडलं नाही, किंवा त्यात आम्ही सहभागी नाहीत तर ते खरं समजून त्या विषयाची योग्य पध्दतीने आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. शेवटी सरकार हे मायबाप असतं ,यात कोण दोषी आहे ते बाहेर येईलच पण तुर्तास ज्यांच्यावर लाठीमार झाला, जे जखमी झाले त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याव असं काही जण म्हणत आहेत, यामुळे तणाव निर्माण होईल का? असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला असता त्यावर उत्तरादाखल त्या म्हणाल्या, या मागणीबद्दल माझं मत वर्षानुवर्षे तेच आहे. पहिले तर मराठा समाजाच्या या मागणीला योग्य प्रतिसाद आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे तथापि यावरून कोणी ओबीसी व मराठा समाजात भांडण लावण्याचा प्लॅन आखत असेल तर दोघेही मिळून ते पूर्णपणे अयशस्वी करतील असं पंकजा मुंडे म्हणाल्या.