Parbhani : सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लाठीहल्ल्याची चौकशी करून पोलीस अधिकार्यांना निलंबित करा
परभणी : अंतरवाली (सराटी ता. अंबड जि. जालना) येथे मराठा समाज बांधवावर लाठीमार केलेल्या जालनाच्या पोलीस अधीक्षकांना निलंबीत करावे व लाठी हल्ला केलेल्या सर्व अधिकार्यांची चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अंतरवाली सराटो येथे मराठा समाजातील गावकरी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत होते. पण शुक्रवारी पोलीस प्रशासनाने उपोषणकर्ते व गावकरी यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करून उपोषण उधळून लावले. यामध्ये वृद्ध महिला, लहान मुले. गावकरी जखमी झालेले आहेत. शांततेत आंदोलन करणार्या उपोषणकत्यांवर जालना पोलीस अधिक्षकांनी व त्यांच्या अधिकार्यांंनी लाठीचार्जचे आदेश देऊन उपोषणकर्त्यांना, महिलांना, गावकर्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या पोलीस कार्यवाहीमुळे रझाकारांची आठवण झाली आहे. तरी तात्काळ या सर्वांची चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबीत करण्यात यावे. या घटनेचा सकल मराठा समाज, परभणीच्या वतीने शासनाचा व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
निवेदनावर नितीन देशमुख (स. अध्यक्ष, मराठा सेवा मंडळ), गजानन जोगदंड (महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), बालाजी मोहिते (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), बाळासाहेव रेंगे, प्रदीप भालेराव, अजयराव गव्हाणे, सोनालीताई देशमुख (मराठा क्रांती मोर्चा), मंगेश भरकड (जिल्हाध्यक्ष,मराठा सेवा मंडळ), विनोद भुसारे, विजय जाधव, ज्ञानोबा पवार, हर्षद काळे, दिपक शिंदे आदींच्या सह्या आहेत.