Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

२० ते २२ नोव्हेंबरदरम्यान पुण्यात पपेट फेस्टिव्हल

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे होणार आयोजन

पुणे  : कठपुतळी कलेच्या अद्भुत विश्वाचा अनुभव पुणेकर रसिकांना घेता येणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम लागू रंग-अवकाश येथे पपेट फेस्टिव्हल अर्थात कठपुतळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पारंपरिक आणि समकालीन कठपुतळी कलाप्रकारांचा अनोखा संगम पाहायला मिळणार असून, विविध कलाप्रयोग, कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून या कलेचे विविध पैलू उलगडले जाणार आहेत.

महोत्सवाची संकल्पना प्रसिद्ध कठपुतळी कलाकार, दिग्दर्शक आणि संकल्पनाकार अनुरूपा रॉय यांची आहे. देशाच्या विविध भागांतील कलाकार आणि कलापथके या महोत्सवात सहभागी होणार असून, कथाकथन, सामाजिक भाष्य आणि कलात्मक अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून कठपुतळी कलेची ओळख करून देणार आहेत.

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कर्नाटकातील ज्येष्ठ कठपुतळी कलाकार गुंडुराजू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ‘सिल्लेक्याथा रामायण’ हा कठपुतळी प्रयोग. दिनांक २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हा प्रयोग सादर होणार आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील नवव्या पिढीचे ज्येष्ठ कठपुतळी कलाकार एस. गुंडुराजू यांची ही पारंपरिक छायाकठपुतळी कला आहे. तोगालू गोम्बेयाटा या शतकानुशतके जपल्या गेलेल्या चर्मकठपुतळी परंपरेच्या माध्यमातून हिंदू महाकाव्य रामायण सादर केले जाते. सिल्लेक्याथा समुदायाने ही अनोखी कलापरंपरा आजही जतन केली आहे.

दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ‘पपेटशाला’तर्फे ‘अॅम आय लॉस्ट?’ हा पपेट शो (कठपुतळी प्रयोग) सादर केला जाणार आहे. सफर नावाच्या एका लहान मुलाची ही कथा आहे. दिल्लीला जाण्यासाठी गाव सोडल्यानंतर त्याला शोषण आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कठपुतळ्या आणि दैनंदिन जीवनातील वस्तूंचा कल्पक वापर करून सादर होणारा हा प्रयोग बालपण, संघर्ष, जगण्याची धडपड, आशा आणि कथाकथनाच्या परिवर्तनशील शक्तीवर भाष्य करतो.

दिनांक २२ नोव्हेंबर रोजी ‘कटकथा पपेट्री आर्ट्स ट्रस्ट’तर्फे ‘साऊ’ हा प्रयोग सादर होणार आहे. अविनाश कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि अनुरूपा रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या प्रयोगाची प्रेरणा स्वाती राजे यांच्या ‘अंधाराचा गाव’ या मराठी बालपुस्तकातून तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घटनांमधून घेण्यात आली आहे. बुनराकू शैलीतील कठपुतळ्या, स्वतःच्या प्रकाशव्यवस्थेने उजळणाऱ्या कठपुतळ्या आणि अभिनव प्रकाशयोजना यांचा वापर करून साकारलेला हा संवादविरहित प्रयोग एका लहान मुलीची कथा सांगतो. सामाजिक रूढींना आव्हान देत आपल्या गावात आशेचा प्रकाश निर्माण करणाऱ्या या मुलीचा प्रवास यातून उलगडतो.

महोत्सवाच्या तिन्ही दिवसांच्या सकाळच्या सत्रांमध्ये अनुरूपा रॉय यांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जपानमधील बुनराकू रंगभूमीच्या परंपरेवर आधारित कठपुतळ्यांना हालचालींद्वारे जिवंत करण्याच्या तंत्रांची ओळख या कार्यशाळेत करून दिली जाणार आहे. शरीररचना, हालचाली, हावभाव, श्वास आणि डोळ्यांच्या हालचाली यांचा कठपुतळी सादरीकरणात कसा वापर करता येतो, याचे प्रात्यक्षिक या सत्रांमध्ये दाखविण्यात येईल.

याशिवाय कठपुतळी कलेशी संबंधित अनेक खुल्या व्यासपीठावरील सादरीकरणेही महोत्सवात होणार आहेत. ‘मीट द पपेट’ या उपक्रमांतर्गत प्रयोग सुरू होण्यापूर्वी कलाकार कठपुतळ्यांसह प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या कलेच्या निर्मितीप्रक्रियेची आणि सादरीकरणामागील कल्पकतेची जवळून ओळख करून घेता येईल.

सदर महोत्सवातील काही कार्यक्रम हे सशुल्क तर काही विनामूल्य आहेत.

Leave a Reply