अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी रोहित पवारांचे अमित शाह, राहुल गांधींना पत्र; सीबीआय तपासाची मागणी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ सातत्याने चौकशीची मागणी करूनही संबंधित यंत्रणांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातामागील नेमकी कारणे आणि त्यासंदर्भातील विविध संशयास्पद बाबींचा सर्वंकष तपास होणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. केवळ तांत्रिक कारणांचा विचार करून तपास मर्यादित ठेवू नये, तर अपघातापूर्वीच्या घडामोडी, विमानाच्या उड्डाणातील बदल, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित बाबी तसेच घातपाताची शक्यता या सर्व अंगांनी तपास केला जावा, अशी त्यांची मागणी आहे.
या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) काढून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विमानाचे संचालन करणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे कामकाज, आर्थिक व्यवहार आणि कंपनीशी संबंधित व्यक्तींची भूमिका यांचीही सखोल चौकशी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
अपघातापूर्वी विमानाच्या कर्मचारी आणि वैमानिकांमध्ये झालेल्या कथित शेवटच्या क्षणातील बदलांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाच्या उड्डाणाचा मार्ग, ब्लॅक बॉक्समधील माहिती, तांत्रिक नोंदी आणि अन्य उपलब्ध पुराव्यांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच विमानाशी संबंधित तांत्रिक नोंदी, संवादाचे तपशील आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
व्हीएसआर व्हेंचर्सशी संबंधित कथित संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि अन्य संभाव्य संबंधांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तपासातील महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ नयेत किंवा त्यांच्याशी छेडछाड होऊ नये, यासाठी संबंधित व्यक्तींवर योग्य निर्बंध घालण्याची तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास झालेला कथित विलंब आणि त्यानंतर कर्नाटकातून झिरो एफआयआरद्वारे प्रकरण हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासाच्या सुरुवातीपासून घडलेल्या सर्व घटनांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांना पत्र लिहून रोहित पवार यांनी या प्रकरणात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी आवाज उठवावा, असे आवाहन केले आहे. तर अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून हस्तक्षेप करून निष्पक्ष आणि कालमर्यादित चौकशी सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आणि शंका दूर होण्यासाठी पारदर्शक तपास होणे आवश्यक आहे, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
