महात्मा फुले जन्मद्विशताब्दी व चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त २७ नोव्हेंबरला पुणे महापालिकेत अभिरूप सभा
उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या तीन प्रस्तावांना पक्षनेते सभेची मंजुरी; वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन
पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांसंदर्भात उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी मांडलेल्या तीन महत्त्वपूर्ण प्रस्तावांना पक्षनेते सभेने मंजुरी दिली आहे.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला, शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात विशेष अभिरूप सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘महात्मा ज्योतिराव फुले यांचे ऐतिहासिक व वैचारिक मार्गदर्शन’ या संकल्पनेवर ही सभा आधारित असेल. या अभिरूप सभेत महात्मा फुले यांनी तत्कालीन काळात सभागृहात मांडलेले विचार, सादर केलेले ठराव आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेले कार्य त्यांच्या भूमिकेतून सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा आणि ऐतिहासिक योगदानाचा परिचय नव्या पिढीला करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
याशिवाय, पुणे महानगरपालिकेच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये तसेच अधिकृत लेटरहेडवर महात्मा ज्योतिराव फुले यांचा विशेष लोगो वापरण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी हे तिन्ही प्रस्ताव पक्षनेते सभेपुढे मांडले होते. त्यांना सभेने मंजुरी दिल्याने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महात्मा फुले यांनी मांडलेले सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमांचा उपयोग होणार असल्याचे उपमहापौर कार्यालयाकडून सांगण्यात आले.
