fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

‘सह्याद्री कॉलनी’चे नाव बदलल्याने नागरिकांमध्ये संताप 

समाजात दुही माजवणाऱ्यांवर कठोर कारवाईची राजेंद्र जगताप यांची मागणी
पिंपरी  :  पिंपळे गुरव, नवी सांगवीच्या मध्यावर असलेल्या सह्याद्री कॉलनीचे अचानक नाव बदलल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत बदलेला श्रावस्ती बौद्ध विहार नावाचा फलक काढून पुन्हा ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक पूर्ववत बसविला. विशेष म्हणजे श्रावस्ती बौद्ध विहार या फलकावर महापालिकेचे चिन्ह व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा उल्लेख होता. दरम्यान, समाजात दुही माजवणाऱ्यांवर कठोर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिकेकडे मागणी केली आहे.
           गेल्या वीस वर्षांहून अधिक जुनी असलेल्या सह्याद्री कॉलनीचे नाव अचानक बदलण्यात आले. त्याजागी श्रावस्ती बौद्ध विहार नामकरणाचा फलक लावण्यात आल्याने परिसरात नागरिकांमध्ये, युवकांमध्ये चर्चा होऊ लागली. हा फलक नेमका कोणी लावला, हे अद्याप कुणालाही माहीत नाही. ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही हा फलक नेमका कुणी लावला याबाबत माहीत नाही.
          वर्षभरापूर्वी मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, पदपथ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. हे काम सुरू असताना ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक तात्पुरता काढून टाकण्यात आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ‘श्रावस्ती बौद्ध विहार’ या नावाचा फलक उभा करून त्यावर महापालिकेचे चिन्ह, तसेच ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ असा उल्लेख करून हा फलक अज्ञात व्यक्तीने लावून येथील परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडवून दिली.
       यावेळी परिसरातील नागरिकांनी आमचे आधारकार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, पाणी पट्टी, टॅक्स पावती आदी कागदपत्रांवर पूर्वीपासून सह्याद्री कॉलनी असा पत्ता असताना येथील सह्याद्री कॉलनीचे नाव बदलून श्रावस्ती बौद्ध विहार या नावाचा फलक कसा काय लावला जावू शकतात. कुणाची परवानगी घेऊन हा फलक या ठिकाणी लावण्यात आला. या ठिकाणी असलेल्या ट्रस्टचाही पत्ता सह्याद्री कॉलनी आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम नेमकं कोण करीत आहे ? असा सवाल नागरिकांमधून करण्यात येत आहे.
        नागरिकांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी हे कृत्य चुकीचे आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता सदर फलक नावात बदल करून कोणी लावला, याचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन आयुक्तांकडे देणार असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. येथील परिसरातील नागरिकांमध्ये असा असंतोष पसरवून नेमके काय साध्य करायचे आहे ? याचाही शोध घेण्यास सांगण्यात येणार आहे.
          यावेळी लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांनी स्व:खर्चाने त्वरित ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक तयार करून अवघ्या तासाभरात त्याच ठिकाणी काही अंतरावर उभा करून त्या फलकाला राजेंद्र जगताप व उपस्थित नागरिकांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. याप्रसंगी शंकर रेणुसे, संदेश भोसले, बाळासाहेब मखरे, बळवंत बनसोडे, सुधाकर सूर्यवंशी, सुखदेव शिंदे, एस. बी. शिंदे, हरिवंश राम, गणेश मराठे, राहुल बडे, ज्ञानेश्वर चौधरी, विजय वराडे, संतोष बिबवे यांच्यासह सह्याद्री कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————–
पहिल्यापासूनच हा परिसर शांत परिसर म्हणून ओळखला जातो. ‘सह्याद्री कॉलनी’ हे नाव आपण नगरसेवक असताना ठराव करून दिले आहे. असे असताना समाजात दुही माजवण्याच्या उद्देशाने कुणी नावात बदल करीत असेल तर त्यांच्यावर महापालिकेच्या संबंधित विभागाने हा फलक कोणी लावला, याचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन महापालिका आयुक्तांना देणार आहे. येथील परिसरातील नागरिकांमध्ये असा असंतोष पसरवून नेमके काय साध्य करायचे आहे ? याचाही शोध घेण्यास सांगण्यात येणार आहे.
        – राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Reply

%d bloggers like this: