‘पीएमपीएमएल’च्या बस पास दरात दुपटीने वाढ
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. नोकरदार, विद्यार्थी, सामान्य नागरिक हे या दोन्ही मनपा हद्दीत दैनंदिन प्रवासासाठी दैनिक व मासिक पासचा उपयोग करतात. मात्र, आता पीएमपीएमएल कडून बस पास दरात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. हे दर येत्या 4 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत.
सध्या एका मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये ४० व मासिक पास रूपये ९०० तर दोन्ही मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये ५० व मासिक पास रूपये १२०० असे पास वितरीत करण्यात येत असून सदरची सुविधा सुरूच राहणार आहे. या व्यतिरिक्त पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. १२० व मासिक पास रू. २७०० अशी पास सुविधा नव्याने सुरू करण्यात येत आहे. यासंबंधीचा निर्णय नुकत्याच ‘पीएमपीएमएल’च्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पीएमपीएमएल कडून देण्यात आली आहे.
सदरचे मासिक पाससाठी प्रवाशांनी परिवहन महामंडळाचे नजीकचे पास केंद्रावर जाऊन आधार कार्डची झेरॉक्स प्रत
व फोटो देऊन प्रवाशी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दैनिक पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र बसमधील वाहकाला दाखवून वाहकाकडून दैनिक पास घेता येईल.
