Monday, October 19, 2026
Latest NewsPUNE

निष्कलंक राहा; भ्रष्टाचाराला बळी पडू नका : प्रवीण दीक्षित

पुणे : कर्तव्य बजावताना निष्कलंक राहा, भ्रष्टाचाराला बळी पडू नका; मोह टाळा, समाजाप्रती संवेदनशीलता अंगी बाळगा, असा कानमंत्र माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नवोदित पोलीस उपनिरीक्षकांना दिला.

श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ संचलित स्पार्क अकॅडमीतर्फे पीएसआय परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. स्पार्क अकॅडमी, श्री मुकुंद भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माहेश्वरी राम मंदिर ट्रस्टचे शरद सारडा, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, स्पार्क अकॅडमीचे संचालक स्वागत दरक व्यासपीठावर होते. आर्थिक–सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस योग्य दिशा देण्याच्या हेतूने अकॅडमीतर्फे मार्गदर्शन केले जाते.

तुळसाबाई केंद्रे, अमृता बाठे, रोहित जाधव, भिमेश कोटला, मयूर डोंगरे, सागर सरोदे, मयूर गाडे, निखिल कोरपड, विक्रांत तळोले, अक्षय अडवाल, माधव गर्जे, तुषार चव्हाण, श्रीपाद गायकवाड या स्पार्क अकॅडमीच्या मुलाखत बॅचच्या 13 विद्यार्थ्यांची पीएसआयपदी निवड झाली आहे.

प्रदीर्घ सेवेतील अनुभवांची शिदोरी रिती करताना दीक्षित पुढे म्हणाले, कार्यकाळात प्रत्येक तपासाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवणे, वरिष्ठांशी त्याविषयी सल्लामसलत करणे, प्रशिक्षण काळात न समजलेले विषय नेटाने समूजन घेणे, अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. लोकसंपर्क वाढविणे, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे जागरुकतेने–सतर्कतेने अवलोकन करणे ही काळाची गरज आहे. याच प्रमाणे राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय घडमोडींविषयी अवगत असणे आवश्यक आहे. पोलिसी सेवेत स्त्री–पुरुष असा भेदाभेद नसल्याने गैरसोयी असल्या तरी त्यातून नेटाने मार्गक्रमण करावे. सेवेतील संधी नाकारू नका. कुटुंबिय आणि समाजाने पडत्या काळात केलेली मदत कधीही विसरू नका असा सल्लाही त्यांनी दिला.

अधिकारी हे समाजाचे प्रतिनिधीत्व करतात ही मानसिकता ठेवून कार्यक्रमण करीत राहा असे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले.

यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी यशाची वाटचाल कशा पद्धतीने केली याविषयी मनोगत व्यक्त केले.

स्वागत दरक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य समन्वयक मनिषा नरडेकर यांनी केले. आभार समन्वयक श्यामसुंदर कदम यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading