संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त मातंग साहित्य परिषदेतर्फे ‘जागर महापुरुषांच्या विचारांचा’
पुणे : साम्राज्यशाही वृत्तीतून मुक्त होणे ही लोकमान्य टिळक यांची भूमिका होती. ज्या मूल्यांचे जागरण लोकमान्यांनी केले त्यांची धुरा अण्णा भाऊ साठे यांनी पुढे वाहिली. आगरकर कर्ते सुधारक होते. ते अज्ञेयवादी होते. अण्णा भाऊ साठे यांनी सर्वांना जोडणारी–एकत्र नेणारी, वेदनेचे उदात्तीकरण न करणारी साहित्य मांडणी केली असल्याने ते संपूर्ण राष्ट्राचे साहित्यिक आहेत. टिळक, आगारकर आणि साठे यांच्यातील मानवतावाद हा धागा समान आहे. या महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज जातीयवादा पलिकडे जाऊन करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत महनिय वक्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर केला.
मातंग साहित्य परिषदेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त ‘जागर महापुरुषांच्या विचारांचा‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. श्यामा घोणसे, विवेक मासिकाचे सहसंपादक रवींद्र गोळे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापकअध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, संपत जाधव, संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, डॉ. आंबादास सकट, विसाजी लांडगे व्यासपीठावर होते. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, टिळकांनी केवळ उच्चभ्रू जातीचे राजकारण केले नाही तर त्यांना तेल्या तांबोळ्यांचेही पुढारी समजले जात असे. यामुळे टिळकांना बहुजनांचा पाठींबा मिळाला आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहाचले. परंतु ते परंपरावादी होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व दबले गेले. आगारकरांचा सुधारणावादही ठराविक जाती–धर्मापुरता नव्हता. त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला. अण्णा भाऊ साठे हे विश्वात्मक आहेत. त्यांनी सर्व तऱ्हेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. शोषणाचा, साम्राज्यवादाचा विरोध केला. महापुरुष कोणा एका जातीचे, देशाचे नसतात तर ते मानवतेचे उद्धारक असतात.
डॉ. अभय टिळक म्हणाले, टिळक आगरकर यांच्या विचारांमधील समानसूत्र मुक्तीचे आहे. विस्तारवादी साम्राज्यशाहीला टिळक यांचा विरोध होता. टिळक, आगरकर आणि अण्णा भाऊ या तिघांच्या संपूर्ण विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वायत्त, जबाबदार माणूस घडताना सर्व प्रकारची मुक्ती हा आहे.
डॉ. श्यामा घोणसे म्हणाल्या, टिळक–आगरकर यांचे विचार हा पुरोगामी महाराष्ट्राचा पाया आहे. विचारकलहाला भिऊ नका, हे मत आगरकर यांनी मांडले. मतभेद, विचारभेद असले तरी चालतील पण मनभेद झाल्यास राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण होतो, अशी आगरकर यांची भावना होती. आधी केले मग सांगितले असे टिळक–आगरकर आणि अण्णा भाऊ यांचे विचार होते.
रवींद्र गोळे म्हणाले, समाजातील एकत्वाची भावना अण्णा भाऊंच्या साहित्यात दिसते. त्यांनी आपल्या साहित्यात स्त्रीचे शील, पुरुषाचा स्वाभीमान आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य या विषयी कधीही तडजोड केली नाही. समाजाला जोडणारे विचार हा त्यांच्या लिखाणाचा आत्मा होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय भिसे यांनी केले. स्वागत संपत जाधव यांनी तर आभार डॉ. आंबादास सकट यांनी मानले.