एकतेची आणि राष्ट्रीयत्वाची भावना महत्त्वाची डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत
पुणे : सीमेवर राहून देशाचे संरक्षण करणारे जवान आणि शहरात राहून नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीस यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत याची जाणीव असली पाहिजे. आता पुणे शहर देखील असुरक्षित होत आहे, हे नुकतेच आपल्याला समजले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रती नैतिक, सामाजिक, मानसिक, आणि साधनसामग्रीने बंधु आणि भगिनीभाव जपला पाहिजे. आम्ही सर्व भारतीय एक आहोत ही एकतेची भावना मजबूत असणं गरजेचे आहे. मग तुम्ही कोणत्याही जाती-धर्मांचे असले तरी देखील राष्ट्रीयत्वाची भावना महत्त्वाची आहे, असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर या संस्थेच्यावतीने जम्मू आणि कश्मिरमधील सैनिकांकरीता दिव्यांगांनी बनवलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या रवाना करण्यात आल्या. बाजीराव रस्त्यावरील लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, अखिल झांजले, सविता गोकुळे, रचना झांजले, निमा झांजले, विक्रम मूर्ती, डॉ. विलास वाहने उपस्थित होते.
हेमंत जाधव म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील सांबा सेक्टर, डोडा, कुपवाडा, रियासी सह विविध भागांतील सैनिकांना या राख्या आम्ही बांधणार आहोत. नेहमीच्या राख्यांपेक्षा चॉकलेटच्या राख्या जवानांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाकरिता अनेक संस्थांनी सहकार्य केले असून जम्मू काश्मिरमधील जनरल झोरावर सिंग ट्रस्टचे देखील सहकार्य लाभले आहे.
