ताडोबातील वाघांचे होणार स्थलांतर
चंद्रपूर : वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती आणि शक्ती हे पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. जगात १४ देशात वाघ असून त्यापैकी ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत आणि जगातील सर्वाधिक वाघ हे एकट्या चंद्रपुरात आहे. चंद्रपूरात वाघांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे स्थलांतर करण्यात येणार असून ताडोबातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठविण्यात आले. तर पुढे आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकाची परवानगी मागितली आहे, अशी माहिती वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मोहर्ली येथे निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभिकरण कामाचे भुमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थान येथील वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनिता कातकर, हरीष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू आदी उपस्थित होते.
मोहर्ली गाव पर्यटकीय सेवा केंद्र होणार
ताडोबाचे मुख्य आकर्षण असलेल्या मोहर्ली गावाच्या सर्वंकष सुंदरतेसाठी आराखडा तयार करण्यात येईल. मोहर्ली गावासाठीही आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येईल. गावात पायाभूत सुविधांसोबतच आर्किटेक्चरच्या माध्यमातून गावातील भिंती रंगविणे, आकर्षक मूर्ती लावणे आदी बाबींमधून पर्यटकीय सेवा केंद्र म्हणून मोहर्ली नावारुपास येईल.
ताडोबावर आधारीत उत्कृष्ट फिल्मची निर्मिती : प्रसिद्ध छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थु यांनी अतिशय मेहनत घेऊन माया वाघीण आणि तिच्या बछड्यांवर आधारीत आई-मुलाचे प्रेम दर्शविणारी सुंदर शॉर्टफिल्म तयार केली आहे. मुथ्थु यांनी ताडोबावर आधारीत दर्जेदार 30 – 35 मिनिटांची आकर्षक फिल्म तयार करावी. ही फिल्म मुंबईच्या चित्रपटनगरीत दाखविण्यात येईल. तसेच वाघांची माहिती देणाऱ्या केंद्रासोबातच मोहर्ली येथे सात डायमेंशनयुक्त थिएटर तयार करावे. जेणेकरून वाघांप्रमाणेच येथील थिएटर प्रसिद्ध झाले पाहिजे.
राज्यातील व्याघ्र प्रकल्पाला उत्तम दर्जा :
देशातील सहा व्याघ्र प्रकल्पाला उत्तम मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सहापैकी तीन व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील आहे. वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच गावक-यांनीसुध्दा जंगलांचे संवर्धन, संरक्षण केले आहे आणि त्रासही सहन केल्याचे वनमंत्री म्हणाले.
