Saturday, May 9, 2026
Latest NewsSports

भारत बुद्धिबळातील एक ताकदवान देश ठरेल – भरतसिंह चौहान

पुणे : बुद्धिबळात एक दिवस भारत सर्वाधिक ताकदवान देश म्हणून पुढे येईल आणि तो दिवस फार दूर नाही, असे प्रतिपादन आशियाई बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष भरतसिंग चौहान यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित ६०व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेला पुणे येथे सुरुवात झाली.
 
या स्पर्धेचे उद्घाटन  उच्च, तंत्र शिक्षण मंत्री व  पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, आशियाई बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष भरतसिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर आणि मानद सचिव निरंजन गोडबोले, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, राजेंद्र शिदोरे, चीफ आर्बीटर गोपा कुमार एम एस , दिप्ती शिदोरे,अथर्व गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
 
या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माझ्यासमोर ज्या काही मागण्या येतात, त्या अनेकदा मी लगेच जाहीर करतो. पण, या वेळी जी संकुलाची मागणी केली आहे, त्यासाठी थोडा विचार करण्यासाठी वेळ हवा. बॅडमिंटनसाठी हॉल हवा अशी मागणी केली जाते तेव्हा काय हवे हे लगेच समोर येते. पण, बुद्धिबळासाठी काय हवे, जागा हवी, की हॉल याची माहिती कळायला हवा. सांगलीचे पालकमंत्री असताना बुद्धिबळासाठी असे मोठा हॉल निर्माण केला होता. त्या धरतीवर काही करायचे असेल तर, महापालिकेत खेळासाठी आरक्षण असते, त्यातून ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकात पाटील म्हणाले.
 
बुद्धिबळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमधून हा विषय अभ्यासाचा एक भाग म्हणून नियोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. खेळासाठी वेळ द्यावा लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासकडे दुर्लक्ष होते. त्यातूनही ही मुले वेळ काढून अभ्यासही सोडत नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच खेळाडूंसाठी २५ ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही श्री पाटील यांनी या वेळी दिली. खेळासाठी प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे हरियाना, पंजाबनंतर एक राज्य म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळविल्यावरही महाराष्ट्र सरकार खेळाडूंना रोख पारितोषिक आणि क्लास वनच्या नोकरी देत असल्याचेही पाटील यांनी निदर्शनास आणले.
 
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अलिकडच्या काळात बुद्धिबळ खेळामध्ये भारत एक ताकदवान देश म्हणून समोर येत आहे. यापूर्वी बुद्धिबळात वर्चस्व असणारे देशही आता हे मान्य करू लागले आहेत. सध्या सुरु असलेल्या विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत पोचले आहेत हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. देशातील ग्रॅण्डमास्टर्सची संख्या वाढत आहे आणि लवकरच देशात ग्रॅण्डमास्टर्सचे शतक साजरा करण्याचाही दिवस फार दूर नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 
भारतीय बुद्धिबळ संघटनेने गेली अडीच वर्षे खेळ आणि खेळाडूंसाठी खूप काम केले आहे आणि आणखी काम करण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. गेल्या काही वर्षात अनेक कंपन्यांनी खेळासाठी निधी उपलब्ध करून देण्यात फारसे स्वारस्य दाखवले नाही. पण, बुद्धिबळ संघटनेने पारितोषिक रकमेत कुठेही कपात केली नाही. भविष्यात आणखी काही कंपन्या जोडल्या गेल्या, तर ती रक्कमही खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत आणि सुविधांसाठी जोडली जाईल, असे  भरतसिंग चौहान यांनी सांगितले.  चौहान यांनी यावेळी आयोजकांचे आभार मानून, उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
 
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी प्रास्ताविक केले, तर एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading