Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

वक्तशीरपणा आणि ध्येयवादी असलो तरच यशस्वीतेकडे वाटचाल शक्य – कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त)

पुणे : भारतीय सैन्यामध्ये जात, पात, धर्म असा भेदाभेद नसतो. सैन्यदलातील जवान आणि अधिकारी कमी बोलतात व काम जास्त करतात. वक्तशीरपणा, हसतमुखपणा ठेऊन मोठ्यांचा मान राखत ध्येयवादी बनलात, तर प्रत्येकजण आयुष्यात यशस्वीतेकडे वाटचाल करू शकतो, असे मत कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. कोयता घेऊन पुण्यात दहशत माजविणा-या तरुणांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाठलाग करुन चोप देणा-या पोलीस नाईक धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदेशाही पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

कर्नल सदानंद साळुंके म्हणाले, ध्यान केले तर ज्ञान मिळेल, भक्ती केली तर शक्ती मिळेल, हे सर्व मिळवित आई-वडिलांना अभिमान वाटेल, असे काम प्रत्येकाने केले पाहिजे. लढाई शूर वीरांसाठी असते. सन १९६५ व १९७१ च्या लढाईमध्ये अनेक जवानांनी पराक्रम गाजविला आहे, असे सांगत प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांनी पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना समाज सुरक्षेबाबत देखील अत्यंत जागरुकपणे कार्य केले आहे. पुण्यातील कोयता गँगला आळा बसावा, याकरिता शौर्य गाजविणारे हे रिअल लाईफ सिंघम आहेत. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading