Saturday, May 9, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली – राहूल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी चर्चेला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेपासून ते मणिपूरमधील जातीय संघर्षापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मणिपूरच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. मणिपूरचे तुम्ही दोन भाग केले आहे. मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या करण्यात आली, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच मी मणिपूरला गेलो होतो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत, कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर हा शब्द वापरला, पण आजचे वास्तव हे आहे की, मणिपूर आता विभागले गेले आहे, सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केले आहेत, मणिपूरचे विभाजन केले आहे. मी मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये गेलो. तिथल्या महिलांशी बोललो, मुलांशी बोललो, जे पंतप्रधानांनी आजपर्यंत केले नाही.

रावण दोन लोकांचे ऐकत असे. मेघनाथ आणि कुंभकरण. तसेच नरेंद्र मोदी दोन लोकांचे ऐकतात. अमित शहा आणि अदानी. लंका हनुमानाने नाही तर रावणाच्या अहंकाराने जाळली, रावणाचा वध रामाने नाही तर त्याच्या अहंकाराने केला, असे ते म्हणाले. राहुल यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, मणिपूरमध्ये सात दशकात जे काही घडले, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे.


राहुल गांधी म्हणाले की, मी भाषणाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारत हा एक आवाज आहे, त्या आवाजाची तुम्ही मणिपूरमध्ये हत्या केली आहे. याचा अर्थ तुम्ही मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. मणिपूरच्या लोकांना मारून तुम्ही भारताचा घात केला आहे. तुम्ही देशभक्त नाही, देशद्रोही आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात.

एक माझी आई इथे बसली आहे तर दुसरी दुसऱ्या आईची मणिपूरमध्ये हत्या करण्यात येत आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसाचार थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. भारतीय सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते, पण तुम्ही ते करत नाही. पंतप्रधान मोदी भारताचा आवाज ऐकत नसतील तर ते कोणाचा आवाज ऐकतात? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading