Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

कोण रवींद्रनाथ टागोर विचारणारेही समाजात आहेत डॉ. न. म. जोशी यांची खंत

पुणे : काळ प्रचंड बदलला आहे. कोण रवींद्रनाथ टागोर असा प्रश्न विचारणारे आज समाजात आहेत. आयुष्यात अखंड कर्तृत्व करणाऱ्या व्यक्ती अंधारात राहतात; पण मी निराश नाही. अंधाऱ्या वातावरणात काही प्रकाशाची बेटे दिसतात. ही प्रकाशाची बेटेच समाजाला आधार देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिकप्राप्त ‌‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाचा डॉ. ज्योती रहाळकर यांनी मराठीत अनुवाद केला असून या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज (दि. 7) डॉ. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिग्नेट पब्लिकेशन आयोजित ‌‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध समीक्षक वंदना बोकील-कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. सिग्नेट पब्लिकेशनसचे संचालक ॲड. प्रमोद आडकर, डॉ. ज्योती रहाळकर, डॉ. जयेश रहाळकर व्यासपीठावर होते.
डॉ. जोशी पुढे म्हणाले, ‌‘गीतांजली’ ही साहित्यकृती वैयक्तिक, अध्यात्मिक, सामाजिक, अधिभौतिक विचारांनी भरलेली आहे. ही साहित्यकृती म्हणजे मुक्त आत्म्याचा मुक्तसंवाद आहे. या साहित्यकृतीचा सरलता, समग्रता आणि सार्थता या गुणांनी परिपूर्ण असा अनुवाद डॉ. ज्योती रहाळकर यांनी केला आहे. हे अभिनंदनिय आहे.
‌‘गीतांजली’ या महाकाव्याला नोबेल पारितोषिक मिळाले त्यानंतर या महाकाव्याची महती देशवासियांना कळली. परदेशातील मान्यतेची मोहोर भारतीय साहित्यकृतीवर उमटल्यानंतर त्याची महती आपल्या देशवासीयांना कळते. ही जी सामाजिक परिस्थिती त्या काळी होती तशीच परिस्थिती आजही आहे, अशी खंत वंदना बोकील-कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
देशातील सध्याची परिस्थिती पाहता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी पुन्हा जन्म घ्यावा, अशी टिप्पणी ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
अनुवादाविषयी बोलताना डॉ. ज्योती रहाळकर म्हणाल्या, ‌‘गीतांजली’ या महाकाव्याला नोबेल पारितोषिक कसे मिळाले या विषयी जाणून घेताना या काव्याचा हिंदी गद्य अनुवाद वाचनात आला; तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. यावरून मराठी पद्यानुरूप अनुवाद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
मान्यवरांचे स्वागत ॲड. प्रमोद आडकर आणि डॉ. ज्योती रहाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पेंडसे यांनी केले तर आभार डॉ. जयेश रहाळकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading