Wednesday, September 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्याचा विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

जेजूरी : जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम सुफलाम् वातावरण निर्माण व्हावे राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली. जेजुरी विकासासाठी १०९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पवार बोलत होते.

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. विकासासाठी महामार्ग महत्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल.

राज्यातील उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दराने वीज पुरविण्यासाठी ६७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती, पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून गुंजवणी योजना मार्गी लावण्यात येईल. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे साडेतीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

लाभार्थ्यांनी विविध योजनांमधून मिळालेल्या लाभाचा उपयोग कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक अमोल शिंदे यांनी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली. या उपक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतल्याने राज्यात अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत आणि जिल्ह्यातील विकासकामांबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा प्रत्यक्षात लाभ होण्यासाठी गावपातळीवर यंत्रणा पोहोचली. सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी, पीएम किसान योजना, सातबारा संगणकीकरणात जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या रस्ते व मेट्रो प्रकल्पांनाही गती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार सर्वश्री दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनावणे,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. स्वामित्व योजना, कृषी यांत्रिकीकरण, जि. प. कृषी विभागातर्फे अवजार खरेदीसाठी अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंसहायता समूहाला अनुदान, स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, सौर पंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पर्यटन विकासासाठी अनुदान, जि. प.तर्फे महिलांना अर्थसहाय्य, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज परतावा योजना, श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरी पालखीतळ (ता. पुरंदर) येथे उपस्थित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची भव्य व्यवस्थाही आज करण्यात आली. उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने बसेसची व्यवस्था केलेल्या लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी, बीएसएल, हिमोग्लोबीन, एसपीओटू आदी तपासणी करत आवश्यक त्यांना औषधोपचारही करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading