ऑडिओ क्लिपने केला नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचा खुलासा
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आधुनिक काळातील विश्वकर्मा अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अकाली घेतलेल्या exit मुळे संपूर्ण सिनेविश्वाला धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले असा प्रश्न विचारला जात असतानाच. एका ऑडिओ क्लिपने त्यांच्या आत्महत्या मागील कारणांचा खुलासा केला आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री बाराच्या सुमारास नितीन चंद्रकांत देसाई हे दिल्लीहून मुंबईला परत आले होते. त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास ते आपल्या कर्जत येथील ND Film studio मध्ये पोहोचले. तेथे आल्यावर देसाई यांनी आपल्या मॅनेजरची भेट घेतली अन् “उद्या तुला एक ऑडिओ क्लिप देतो. त्या संबंधीत व्यक्तींना दे”, असे त्याला सांगितले. अन् आपल्या खोलीकडे निघून गेले. सकाळी उठल्यावर मॅनेजरने देसाई यांना भेटण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. अन् त्यांच्या शेजारीच या ऑडिओ क्लिप ठेवण्यात आल्या होत्या.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये काल रात्री आत्महत्या करण्यापूर्वी देसाई यांनी काही voice msg रेकॉर्ड करून ठेवले आहेत. यामध्ये आपण आर्थिक विवंचनेत असून काही व्यावसायिक आपल्याला त्रास देत असल्याचे देसाई यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता या संबंधीत व्यावसायिकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
ND Film studio वर येणार होती जप्ती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत देसाई आणि त्यांच्या पत्नीने एका कंपनी कडून जवळपास 150 कोटींच कर्ज घेतलं होतं. मात्र त्यांना ते परत करता आलेलं नाही. आता त्या कर्जाची रक्कम व्याजासह अडीचशे कोटी इतकी झालेली आहे. ही कर्जाची परतफेड न केल्याने देसाई यांच्या काही मालमत्तांसह ND Film studioवर जप्तीची कारवाई होणार होती. यासाठी संबंधीत कंपनीने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याची परवानगी देखील मागितली होती. मात्र, त्यावर कारवाई होण्यापूर्वीच नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
