प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
मुंबई : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गळफास घेऊन देसाई यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ आदी सिनेमांसाठी चंद्रकांत देसाई यांनी काम केलं आहे. सन 2000 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’साठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता.
नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी कोकणातील दापोली या ठिकाणी झाला. देसाईंनी त्यांच्या शाळेत वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड येथे मराठी माध्यमात शिक्षण घेतले होते. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. 1987 साली त्यांनी चित्रपट सृष्टीमधील कारकीर्द सुरूवात केली.
दरम्यान, दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांच्यावर मे महिन्यात एका अँड एजन्सीने 51.7 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एजन्सीने तीन महिने काम करूनही नितीन देसाई यांनी त्यांना पैसे दिले नसल्याचं सांगितलं होतं. परंतु तेव्हा नितीन देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. याआधीही एजन्सीनं आपल्यावर असे आरोप लावल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट
परिंदा, 1941- ओ लव्ह स्टोरी, आ गले लग जा, अकेले हम अकेले तुम , खामोशीः द म्युझिकल, दिलजले , माचीस , इश्क, प्यार तो होना ही था, हम दिल दे चुके सनम, बादशहा, जोश, मिशन कश्मीर , वन टू का फोर, द लेजेन्ट ऑफ भगतसिंग, मुन्नाभाई एम.बी.बी.एस, लगे रहो मुन्नाभाई, धन धना धन गोल , स्वदेस, जोधा अकबर, गॉड तुस्सी ग्रेट हो, मंगल पांडे, दोस्ताना , वन्स अपॉन टाइम्स इन मुंबई , बालगंधर्व, प्रेम रतन धन पायो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अजिंठा
