‘चित्रमाऊली’तून उलगडणार सुलोचना दिदींचा जीवनप्रवास
पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री स्व. सुलोचना दिदी यांचा जीवनप्रवास ‘चित्रमाऊली’ या एक तासाच्या लघुपटाद्वारे रसिकांसमोर उलगडणार आहे. सुलोचना दिदींच्या जन्मदिनानिमित्त हा लघुपट प्रथमच प्रदर्शित होत आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित कार्यक्रम रविवार, दि. 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता एस. एम. जोशी सभागृहात होत असल्याची माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी दिली.
केंद्र सरकार अंतर्गत असलेल्या फिल्मस् डिव्हिजनने या लघुपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन शैलेश शेट्ये यांचे आहे. रमेश देव, सीमा देव, अशोक सराफ, निवेदिता सराफ, मृणाल कुलकर्णी या चित्रपट क्षेत्रातील कलाकारांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सुलोचना दिदी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या असून त्या लघुपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ऐकता ये णार आहेत.
लघुपटाच्या प्रदर्शनानंतर सुलोचना दिदी यांच्यावर चित्रीत झालेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल वाद्यवृंदासह सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संहिता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी लिहिली आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, गेट सेट गोचे अमित कुलकर्णी यांनी दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
