Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRA

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

परभणी : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या समाजसेविका व संस्थांना काम करण्यास प्रेरणा मिळावी. महिला व बालकांच्या उन्नतीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी या क्षेत्रात कार्यरत समाजसेविका व संस्थांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित असल्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महिला व बालविकास कार्यालयाच्याकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला समाजसेविका तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान २५ तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी या क्षेत्रात कमीत कमी १० वर्षे काम केलेले असावे. तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था, पब्लिक ट्रस्ट १९५० किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार पंजीबद्ध असावी. तसेच संस्थेचे महिला व बालविकास क्षेत्रातील सेवा व कार्य ७ वर्षाहून जास्त असावे.

यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार अथवा दलित मित्र पुरस्कार मिळालेला नसेल, अशा महिला समाजसेविका पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू शकतात. अर्जदार महिलेचे कार्य जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षाशी संबंधित नसावे. पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तिगत मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही. तरी जिल्ह्यातील पात्र समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांनी सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षासाठीचे प्रस्ताव जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी विहित नमुन्यात खालील दिलेल्या ठिकाणी ३१ जुलै २०२३ पर्यंत तीन प्रतीत सादर करावे.

जिल्हास्तर, विभाग स्तर आणि राज्यस्तर यापैकी जे असेल ते नमूद करावे. वैयक्तिक परिचयपत्र, विना दुराचार प्रमाणपत्र, गैर वर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस प्राधिकरणाचे पत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहर केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading