समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य शाहीरीमध्ये : पांडुरंग बलकवडे
पुणे : प्रत्येक टप्प्यावर समाजाला दिशा देण्याचे काम शाहिरी परंपरेने आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या शाहिरानी केलेले आहे. समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य शाहिरीमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. पांडुरंग बलकवडे यांनी केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने ‘गर्जली मऱ्हाठी शाहिरी’ या आचार्य हेमंतराजे मावळे लिखित शाहिरी रचनांच्या ग्रंथावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. पांडुरंग बलकवडे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, शाहीर हेमंतराजे मावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, संगीताराजे मावळे उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, “शाहीरी ही लोककला असून त्याचे मूळ प्राचीन आहे. ही कला अधिकाधिक लोकाभिमुख होणे आवश्यक आहे. सध्या या कलेला चांगले दिवस येताना दिसत आहेत. स्त्री शाहीरही उभ्या राहत आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. शाहीर हेमंत मावळे यांचे अवघे कुटुंबीय या प्रयत्नात सहभागी आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “शाहिरांचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. सारस्वतांच्या दरबारात त्यांचे स्थान कायम उच्च आहे. गोड कल्पनाच्या पखरणीत न रमता त्यांनी देशभक्तीसाठी डफावर थाप दिली. शोषणाच्या व्यवस्थेविरुद्धचा लढा त्यांनी शब्दातून मांडला. जे जगले, त्यांनी जे भोगले ते अण्णाभाऊंनी साहित्यातून मांडले. विद्रोहाचे रूपांतर विद्वेषात होऊ दिले नाही हे त्यांचे मोठेपण होते. शाहिरी काव्याने मराठी काव्याचे दालन समृद्ध करण्याचे काम केले आहे.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, “सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले विविध शाहीरी प्रकारांचे लेखन या पुस्तकात केले आहे. यात २५ पोवाडे समाविष्ट केलेले आहेत. यात मूल्याशिक्षणावर आधारित फटका, राष्ट्रीय मतदार दिन, देशाचा अमृतमहोत्सव, वीर अभिमन्यू यांच्यावरील पोवाडे आहेत.
रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले, अण्णाभाऊंच्या साहित्याचे स्मरण या निमित्ताने होत आहे ही चांगली बाब आहे. लावणी, शाहिरी ही लोकजागराची साधने होती हे लोकांसमोर येणे गरजेचे आहे. आगामी काळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हे अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रभाकर ओव्हाळ यांनी पाठवलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. सुनील भंडगे यांनी केले. होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.
*पोवाड्याने उपस्थितांची जिंकली मने!*
कु. अक्षदा इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्रगीत आणि अण्णा भाऊ साठे यांचा ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा पोवाडा सादर केला. या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित सर्वांनीच पोवाड्याला मनापासून दाद दिली.
