पर्यावरण समन्वयक शिक्षक कार्यशाळेचे आयोजन..
पुणे – विविध शाळांमधील विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार घडावे, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे यासाठी वनराई संस्थेच्या वतीने पर्यावरण वाहिनीच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन वर्षभर केले जाते. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे यासाठी पुण्यासह राज्यातील शाळांना वनराई पर्यावरण वाहिनीशी जोडण्यासाठी पर्यावरण समन्वयक शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २१ जुलै रोजी, सकाळी १०.३० ते ५.०० वाजेपर्यंत मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराईच्या कार्यालयात ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती वनराई पर्यावरण वाहिनीचे प्रकल्प संचालक भारत साबळे यांनी दिली.
भारत साबळे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणारे बदल. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, तापमानवाढ, पर्यावरणाच्या या असमतोलामुळे, कोविड- १९. स्वाईन फ्लु, श्वसनाचे विकार या नवनवीन आजारांचा सामना करावा लागत आहे. भविष्यात अशा अनेक संकटाना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. वरील समस्यांच्या पार्श्वभूमीवर देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या उद्याच्या नागरिकांना म्हणजेच शालेय विद्याथ्र्यांना पर्यावरण संवर्धन व संरक्षणाप्रती संवेदनशील व कृतीशील बनवणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी ‘वनराई पर्यावरण वाहिनीच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेतला आहेच. वनराई पर्यावरण वाहिनीचा कृती कार्यक्रम सन २००२ पासून शाळा-शाळांमधून राबवला जात आहे.
जल संवर्धन, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा संकलन, वातावरणातील बदलांचे परिणाम व उपाय यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे संस्कार रुजवून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा विचार घराघरांमध्ये पोहचवण्याने कार्य गेली २१ वर्षे वनराई पर्यावरण वाहिनीद्वारे अव्याहतपणे सुरु आहे. या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थामध्ये पर्यावरण जागृती होण्यासाठी व त्यांना सर्वगुण संपन्न बनवण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पर्यावरण जागृती सांस्कृतिक स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती, स्वच्छ सुंदर शाळा, औषधी वनस्पती बाग, वातावरणातील बदल पर्यावरण स्पर्धा, पर्यावरण पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
