… पण मी मंत्री पदावर दावा करणार नाही – बच्चू कडू
अमरावती : राज्यात सध्या खातेवाटपाची चर्चा सुरू असून यामुळे सरकारमध्ये अनेकजण नाराज आहेत. अनेकांनी याबाबत उघड नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळत नसल्याने अस्वस्थ असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं सांगितलं. याबाबत आपण निर्णय घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करू असंही ते म्हणाले.
सरकारमधील अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरून अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत. मात्र, अजून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप रखडले आहे. यामुळे सरकारमधील अनेक नेते नाराज आहेत. यावर पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांनी म्हटलं की, मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय़ घेऊ नये असं म्हटलं. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर घेईन. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येच राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
आम्हाला मंत्रिपदाची हाव नाही, तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीचा कंटाळा आला असल्याचंही बच्चू कडू म्हणाले. आधीच्या मविआ सरकारमध्ये केवळ उद्धव ठाकरेंमुळे सहभागी झालो होतो. उद्धव ठाकरेंनी आम्हाला दोन अपक्ष आमदारांना पाठिंब्यासाठी विनंती केली होती आणि त्यामुळे त्यांना मी पाठिंबा दिला होता. त्यांनी राज्यमंत्रीपदसुद्धा दिलं होतं. यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन असंही बच्चू कडू म्हणाले.
शिंदेंसोबत जाण्याच्या निर्णयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांग मंत्रालय देऊ असं शिंदेंनी कबूल केलं होतं आणि त्यांनी ते दिलं. देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय झालं. खरंतर शिंदे साहेबांचा मी ऋणी राहीन. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.
