सॅफरॉन क्रिकेट क्लबची विजयी सलामी !
पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब, इनव्हेंटीस आणि विहार ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत शुभम खटाळे याच्या शतकी खेळीच्या जोरावर सॅफरॉन क्रिकेट क्लबने कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाचा ५६ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना सॅफरॉन क्रिकेट क्लबने २५२ धावांचा डोंगर उभा केला. शुभम खटाळे याने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ९ षटकारांसह ११८ धावांची खेळी केली. यासोबत नचिकेत कुलकर्णी याने ३७ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ७२ धावांची खेळी साकारली. या दोघांनी तिसर्या गड्यासाठी ४५ चेंडूत १०७ धावांची स्फोटक भागिदारी रचली व संघाला विशाल धावसंख्या गाठून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाचा डाव १९६ धावांवर मर्यादित राहीला. चिन्मय कुर्वे याने ५५ धावांची तर, नितीन चौहान (२५ धावा) आणि हिमांशु चौहान (२१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. श्रीपाद भागवत (४-३५) आणि विशाल प्रभाकर (२-२०) यांनी उपयुक्त गोलंदाजी केली व संघाचा विजय सोपा केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सॅफरॉन क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद २५२ धावा (शुभम खटाळे ११८ धावा (४७, ११ चौकार, ९ षटकार), नचिकेत कुलकर्णी ७२ (३७, ८ चौकार, ४ षटकार), हिमांशु चौहान २-५४);(भागिदारीः तिसर्या गड्यासाठी शुभम आणि नचिकेत यांच्यात १०७ (४५) वि.वि. कॉर्पोरेट विलोव्हर्सः २० षटकात १० गडी बाद १९६ धावा (चिन्मय कुर्वे ५५ (२५, १ चौकार, ७ षटकार), नितीन चौहान २५, हिमांशु चौहान २१, श्रीपाद भागवत ४-३५, विशाल प्रभाकर २-२०); सामनावीरः शुभम खटाळे;
