पक्ष सोडणार नाही; पण राजकीय विश्रांती घेणार – पंकजा मुंडे
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरात भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. कारण त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत तसेच त्या कॉँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेवर आता पंकजा मुंडे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून मी सुट्टी घेतलेली नाही. मला एक दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मलाही विचार करण्याची आवश्यकता आहे, आताच्या परिस्थितीमध्ये मला ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे. ेक दोन महिने मी सुट्टी घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी विचार करणार आहे,असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक निर्णय झाले. मला उमेदवारी न मिळाल्याने मी नाराज असल्याचे म्हटलं गेले. अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्पष्टपणे भूमिका मांडल्या आहेत. परत परत भूमिका मांडण्याचं माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. गेले काही दिवस अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर चांगलं आहे असे भाष्य केले होते. याबाबत मी फारसं भाष्य केले नाही. परवा आलेल्या बातमीमध्ये सांगितलं की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि मी कॉंग्रेसच्या वाटेवर आहे. या संदर्भात मी मानहाणीचा दावा ठोकणार आहे. माझं करिअर हे कवडीमोलाचं नाही. गेली 20 वर्षे मी राजकारणात आहे त्यामुळे मी लोकांसोबत थेट संवाद साधते,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
“पाठीत खंजीर खुपसण्याचे रक्त माझ्या शरीरात नाही. खुपसलेला खंजीर कसा योग्य आहे हे सांगण्याचे माझ्याकडे शब्द नाहीत. प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचे नाव येतं. हा माझा दोष नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला हवं. संधी मिळाली नाही म्हणून मी कुठेही टिप्पणी केली नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
