Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

संगीत साधनेत शुद्धता, एकाग्रता व निरपेक्ष भाव जपला छाया गांगुली यांची भावना

पुणे : “लहानपणापासून संगीताची आवड असल्याने संगीत साधनेकडे वळले. आकाशवाणीमध्ये कार्यरत असताना अनेक प्रतिष्ठित कलाकारांचे मार्गदर्शन सहवास लाभला. विविधभारतीवरील आरोही कार्यक्रमात, तर गमन या चित्रपटात पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली. शुद्ध, एकाग्र व निरपेक्ष भाव संगीत साधना करताना जपला,” अशी भावना ज्येष्ठ गायिका छाया गांगुली यांनी व्यक्त केली.
संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष शेखर सेन यांच्या हस्ते छाया गांगुली यांचा एकाहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी गांगुली व सेन यांच्या हस्ते नाद विदूषी गुरु अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावरील सुरोपनिषद या पुस्तकाच्या बंगाली आवृत्तीचे प्रकाशन झाले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ बासरी वादक नित्यानंद हळदीपूर, लेखक डॉ. सुनील शास्त्री, चित्रपट संगीताचे अभ्यासक स्वप्नील पोरे, संयोजक शिरीष चिटणीस, प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी आदी उपस्थित होते.
छाया गांगुली म्हणाल्या, “आकाशवाणी व दूरदर्शनमध्ये जवळपास ३६ वर्षे सेवा केली. या काळात जयदेव, मधुराणी, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, आशा, पंचम दा यांसह इतर अनेक मान्यवर कलाकारांना आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेता आले. जयदेव यांनी गायनाची संधी दिली. मधुराणी यांनी संगीताची समज वाढवली. संगीत सरिता कार्यक्रमातून अनेक सादरीकरण करता आली. कलेचा सन्मान केला. कलेने मला सन्मान दिला.”
शेखर सेन म्हणाले, “महाराष्ट्र अणि बंगाल देशभक्तीची प्रेरणा देणारी ठिकाणे आहेत. संगीत क्षेत्रातील अन्नपूर्णा देवी, एम. एस. सुब्बूलक्ष्मी, लता मंगेशकर यांच्यासारखे आदर्श आमच्यासमोर आहेत. प्रत्येक व्यक्तीमधील ईश्वराची ओळख करणारी भारतीय संस्कृती आहे. अन्नपूर्णा देवी यांचे योगदान अतुलनीय असून, मला बालपणी त्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्य आहे. भारतीय संगीत क्षेत्राला एक वेगळा आयाम देणारे गांगुली यांचे योगदान आहे.”
नित्यानंद हळदीपूर म्हणाले, “अन्नपूर्णा देवी यांनी समर्पण भावनेने कलेची सेवा केली. त्यांचे समृद्ध संगीत अनुभवले. संगीत ही एक साधना आहे. गांगुली यांनी अनेक अजरामर गाणी गायली. आजही त्यांची अनेक गाणी रसिकांच्या तोंडी आहेत.”
धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृपाशंकर शर्मा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading