मातृ-गुरु पूजनाने चिमुकल्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा
पुणे : आई माझा गुरु, आई कल्पतरु… या उक्तीप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला संस्काराचे शिक्षण देणा-या आईचे पूजन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केले. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस् मध्ये गुरूपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी महर्षी व्यासमुनींसह गुरुजनांचे औक्षण करून पूजन केले. यामाध्यमातून गुरूपौर्णिमेचे भारतीय संस्कृतीतील महत्व इतर विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले.
यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, सर्व शाखांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होत. गुरुंप्रती तयार केलेली प्रार्थना देखील विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या म्हटली.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, गुरू हे आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जातात. आई-वडिल हे आपल्या जीवनातील पहिले गुरू आहेत. त्यानंतरचे गुरू हे शाळेतील शिक्षक आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला समाजातील चांगला व्यक्ती घडविण्यामागे शिक्षकांचे मोठे कार्य असते. त्यामुळे आपल्याला घडविणाºया शिक्षकांना विसरू नका. आपल्याला जन्मदात्या आई-वडिलांबरोबर आपल्या शिक्षकांचा देखील आदर राखा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. इन्स्टिटयूटच्या सर्व शाखांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
