Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोलापूरला तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

सोलापूर : सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज दिली.

महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रद्धा जोशी-शर्मा, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राचार्य चंद्रशेखर जयस्वाल, कार्यकारी अभियंता विनय वावधाने आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, भविष्यात या महाविद्यालयातून पर्यटन क्षेत्रासाठी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होतील. त्यातून सोलापूरच्या पर्यटन क्षेत्रवाढीसाठी मदत होईल. होम स्टेसाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात देखील येथे अभ्यासक्रमाचा समावेश केला जाईल. सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनस्थळे अधिक असल्याने जिल्ह्यास तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा, त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच या महाविद्यालयाचे श्री स्वामी समर्थ महाविद्यालय असे नामकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास गतीने व्हावा, पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक पर्यटनस्थळांचा दाखला देऊन आमदार सुभाष देशमुख म्हणाले, या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून, रोजगार निर्मितीची क्षमता पर्यटन क्षेत्रात आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटनात जिल्हा रोल मॉडेल व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, भाविकांना, पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी हॉटेल मालकांनीही प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

दर महिन्यात पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या आकडेवारीचा दाखला देऊन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी होम स्टे करणाऱ्या पर्यटकांचे उचित आदरातिथ्य होण्याच्या दृष्टीने महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांचा विचार व्हावा, तसेच, पर्यटन मार्गदर्शकांची (गाईड) प्राचीन वारसा असलेल्या पर्यटनस्थळांच्या माहितीबाबतची परीक्षा घेऊन अधिकृत परवानाधारक मार्गदर्शक नेमावेत, असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading