राजकीय भूकंप ही शरद पवारांची खेळी – राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंप ही शरद पवारांची खेळी असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, या सर्व सत्तासंघर्षावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब काहीही म्हणो, हे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. अजित पवार यांनी ३० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली आहे.
राष्ट्रवादीतील फूट आणि अजित पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच वर्षापासून जे राजकारण सुरु आहे, ते दिवसेंदिवस किळसवाणे होत चालले आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पवार साहेब कितीही, काहीही म्हणत असले की, त्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. तरी, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.
मला असे वाटते लोकांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मी पुढच्या काही दिवसांत मेळावा आणि बैठक घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचे आहे. लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौरा सुरु होईल. त्यावेळी जागोजागी जाऊन लोकांना भेटेन.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे पुढे म्हणाले की, आपण हा सगळा ड्रामा पाहत आहोत. याची सुरुवात पहाटेच्या शपथ विधीने झाली, मग शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी झाले, आता शत्रू कोण आणि मित्र कोण याचे काही महाराष्ट्रात राहिलेच नाही. मी मेळावा घेऊन त्यावेळी ब-याच गोष्टी बोलेन.
