Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मंत्री पदाची शपथ घेतलेले 9 वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली : जयंत पाटील

मुंबई : अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

येत्या ५ जुलै रोजी पवारसाहेबांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारसाहेबांसोबत असणारा, पवारसाहेबांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले.

आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांना बाजूला करूया आणि पुन्हा एकदा प्रगतीशील, सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे राज्य निर्माण करूया असे शरद पवार यांनी म्हटले आहे. उलथापालथीबाबत ज्या प्रवृत्ती आहेत त्याविरोधात महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading