Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘विज्ञान संशोधकांना ग्लॅमर मिळवून द्या, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासा, अंधश्रद्धा बाजूला सारा’ : गिरीश कुलकर्णी

पुणे :  ‘विज्ञान आणि सायन्स फिक्शन चित्रपट अधिक बनण्यासाठी शास्त्र, संशोधन आणि शास्त्रज्ञ यांना ग्लॅमर प्राप्त होणं आवश्यक आहे, त्यासाठी शास्त्रज्ञांनी समाजात मिसळून संशोधन आणि स्वतः शास्त्रज्ञ यांना ग्लॅमर मिळवून दिलं पाहिजे,विज्ञानाला पुढे नेणारे उपक्रम समाजाने करत राहिले पाहिजे, तरच शास्त्रज्ञ हे चित्रपटाचे हिरो, नायक ठरू शकतील,’ असे मत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान गटाच्या वतीने पुण्यात आयोजित विज्ञान चित्रपट महोत्सवाचे(सायन्स फिल्म फेस्टिव्हल) उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल, येथे १ जुलै सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ झाला.२ जुलै पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हा महोत्सव होईल. विज्ञानात रुची निर्माण करणारे लघुपट(Short Films), माहितीपट(Documentaries) आणि चित्रपट(Movies) या महोत्सवामध्ये दाखविण्यात येत आहेत. त्याच सोबत विषयानुरूप तज्ज्ञांची व्याख्याने, प्रेक्षकांसोबत प्रश्नोत्तरे व चर्चा, विविध कृती अशी सत्रे होत आहेत. विज्ञानात व चित्रपटांमध्ये रस असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्ती या महोत्सवात सहभागी होऊ शकतात.

गिरीश कुलकर्णी  म्हणाले, स्वयंविचार हा विज्ञान निष्ठेतून, स्वयं शिस्त आणि स्वअध्ययनातून विकसित होत असतो, माणसं जेवढी अधिक अभ्यासू होतील तेवढी अधिक प्रश्न विचारू लागतील, विज्ञानाधारित चित्रपट निर्मिती करू शकतील, आज एकूणच विज्ञानाधारित चित्रपटांची मागणी ही कमी आहे, त्यामुळेही सायन्स फिक्शन चित्रपट अधिक बनत नाहीत.

गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले ,’लोक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अधिक प्रगत होऊ नये यासाठी कळपाला पटेल असेच अंधश्रद्ध विचार रुजविण्यात राजकीय नेत्यांना अधिक रस असतो, लोकं वैज्ञानिक व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत झाल्यास अधिक गंभीर, गहन प्रश्न उपस्थित करतील, जे राजकारण्यांना अडचणीचे ठरू शकतात, त्यामुळे माणसं जेवढी अडाणी, मूर्ख राहतील, तेवढी एकगठ्ठा मते मिळतील, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना होण्यासाठी अजूनही राजकीय इच्छाशक्ती कार्यरत नाही, याची खंत वाटते,”

तंत्रज्ञानाने आज खऱ्या अर्थाने मोबाईल, संगणक, फेसबुक, ट्विटर आदी उपकरणांचे लोकशाहीकरण केले हे खूप चांगले झाले, कारण समाजातील अगदी शेवटच्या घटकां पासून ते उच्च पदस्था पर्यंत एका विशिष्ट आणि समान कमांडनेच सर्व उपकरणं चालतात! त्यामुळे माणसाला माणूस बनविण्याचे आणि स्वतंत्रता, समता, बंधुता प्रदान करण्याचे जे खरे मानवी काम होते, जे माणसाला जमले नाही ते कदाचित विज्ञान आणि तंत्रज्ञानाला जमू शकेल असे वाटते, त्यासाठी नव्या पिढीने वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित सायन्स फिक्शन म्हणता येतील असे चित्रपट बनविले पाहिजेत, असे मत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले

गिरीश कुलकर्णी यांची मुलाखत पृथ्वीराज लिंगायत यांनी घेतली.यावेळी गायक व संगीत अभ्यासक समीर दुबळे ,संकेत भंडारे,ओम चव्हाण,सौरव दुर्गेकर,मिलिंद संत,अनिरुद्ध वाघ, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध पाठक यांनी केले.आणि आभार प्रदर्शन समीर दुबळे यांनी केले.

या दिवशी दुपारच्या सत्रात प्लांट इंटेलिजन्स संशोधक डॉ. आदित्य पोंक्षे यांच्याशी व शेवटच्या सत्रात चित्रपट अभ्यासक, लेखक आणि पटकथाकार गणेश मतकरी यांच्याशी चर्चा आयोजित करण्यात आली .

दुसऱ्या दिवशी रविवारी, म्हणजेच २ जुलै रोजी पहिल्या सत्रात संशोधक जी. व्ही. पवन कुमार संवाद साधणार आहेत, दुपारी जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कथेचे अभिवाचन करण्यात येणार आहे, व संशोधक डॉ.मिलिंद वाटवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading