Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

ऐतिहासिक चित्रपटामध्ये लेखन, मांडणी आणि सादरीकरण महत्वाचे

-‘इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?’ या चर्चासत्रात मान्यवरांचा सुर

पुणे : मराठीमध्ये सध्या दिवसागणिक अनेक ऐतिहासिक चित्रपटांच्या घोषणा होतआहेत. अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोवती गुंफलेले कथानक ही मानसिकता निर्माण झाली आहे. ऐतिहासिक चित्रपट काढायचा आणि त्याला व्यावसायिक गणितात बसवण्याचा प्रयत्न करायचा हे न जुळणारे आहे. यामुळे ऐतिहासिक चित्रपट करायचा असेल तर कथानक, मांडणी आणि सादरीकरण याचा अभ्यास करण्याची गरज आहे असा सुर  ‘इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?’ या चर्चासत्रात उमटला. 

बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर ५५ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवात  ‘इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यामध्ये  साहित्यिक  विश्वास पाटील, ज्येष्ठ सिने पत्रकार  दिलीप ठाकूर, दिग्दर्शक व वितरक  अनुप जगदाळे हे सहभागी होते त्यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. 

 मराठी माणसाला शिजेपर्यंत दम असतो पण नीवेपर्यंत नाही असे सांगत साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, मी पानिपत कादंबरी लिहायला पाच वर्षे घेतली मात्र त्यावरचा सिनेमा अवघ्या ११ महिन्यात तयार झाला, मग सिनेमा चालणार कसा? बजेट मिळालं की बनवा सिनेमा असं करून चालणार नाही त्यासाठी किमान वेळ देणे गरजेचे आहे. ‘मुघल ए आझम’ ची निर्मिती १२ वर्षे चालली होती. आपण ऐतिहासिक सिनेमा करताना किमान दोन तीन वर्षे तरी अभ्यास करायला हवा. आज ऐतिहासिक सिनेमाची कोंडी झाली आहे म्हणायला हरकत नाही.  महाभारत आणि रामायण मालिका आल्या, त्यांना तूफान लोकप्रियता मिळाली. त्यांचे लेखक हे प्रतिभावान होते यामुळे पडद्यावर आलेले चित्रण लोकांना भावले. आज आपल्याकडे घाईत काम करायची सवय लागली आहे, परिणामी दोन वर्षांपूर्वी ज्या दिग्दर्शकांचे कौतुक झाले आज त्याची छी थू होतेय ती याच कारणांमुळे शेवटी एवढेच म्हणेल की, पेराल तसे उगवते हे सत्य नाकारता येणार नाही. 

आगामी काळात मराठी तर सोडा पण हिंदी सिनेमा टिकेल की नाही याची भीती, कारण येणाऱ्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम थिएटर मालकांना जाते, त्यांची दादागिरी वाढलेली आहे, दुसरीकडे वेब सिरिज चांगल्या येत आहेत तिथे कुणाची दादागिरी किंवा लॉबी व अडथळे नाहीत. असेही पाटील म्हणाले.

दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे म्हणाले, आजघडीला मोठा सिनेमा बनवणे आणि चालवणे हे मोठे आव्हान आहे. कारण पायरसी रोखणे हे सर्वात मोठे आव्हान निर्मात्यांपूढे आहे. ऐतिहासिक सिनेमाची आज लाट आली आहे,  साधारणपणे दर दोन महिन्याला ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि पुढील वर्षभरात ही सात ते आठ सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटांचे अजीर्ण होणार व निर्मात्यांचे गणित चुकणार यात शंका नाही. 

ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर म्हणाले, भालजींच्या काळात त्यांनी जे ऐतिहासिक चित्रपट आणले ते शिवप्रेमातून आलेले होते. त्याकाळी फारश्या तांत्रिक सुविधा नव्हत्या मात्र त्यांनी आहे त्या साधनात उत्कृष्ठ सिनेमे आणले.  आज  मराठी चित्रपटांचे भवितव्य अवघड दिसतयं कारण पहिल्या दिवशीही प्रेक्षक येत नाहीत. ऐतिहासिक चित्रपट वाढल्याने मराठी चित्रपटांची संख्यात्मक नाही मात्र दर्जात्मक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading