Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

‘मल्हार धून’ कार्यक्रमात मल्हार रागाच्या विविध छ्टांनी पुणेकर रसिक चिंब

पुणे : बाहेर सुरू असलेली पावसाची संततधार, दाटून आलेले वातावरण आणि ‘मल्हार धून’ कार्यक्रमात सभागृहात सादर झालेल्या मल्हार रागाच्या विविध छ्टांनी आज पुणेकर रसिक चिंब भिजले… निमित्त होते ओर्लीकॉन बाल्झर्स आणि व्हायोलिन अकादमी यांच्या वतीने आयोजित आठव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आजपासून तीन दिवसीय स्वरमल्हार महोत्सवाला सुरुवात झाली. 

व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, ओर्लीकॉन बाल्झर्सचे प्रवीण शिरसे, बढेकर गृपचे प्रवीण बढेकर, जावडेकर डेव्हलपर्स विलास जावडेकर, लोकमान्य मल्टीपर्पजचे भालचंद्र कुंटे,व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांच्या उपस्थितीत आज महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.

आठव्या स्वरमल्हार महोत्सवाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडित, सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि बासरीवादक अश्विन श्रीनिवासन यांच्या ‘मल्हार धून – शेडस् ऑफ रेन, स्टोरी ऑफ ताना- रिरी विथ राग संगीत अँड पोएट्री’ या कार्यक्रमाने झाली.

गुजराती लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या ताना – रिरी या दोन जुळ्या बहिणींची आणि तानसेनाची कथा या संपुर्ण कार्यक्रमात गाणी आणि कवितांच्या अनोख्या मिलाफाने गुंफण्यात आली. पाऊस, राग मल्हार, एका कलाकाराचा आंतरिक कल्लोळ आणि त्याच्या आयुष्यातील काही घटना यांचा पूल बांधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केला असल्याचे वैभव जोशी यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी स्वतः च्या कवितांसोबतच इतर काही कवींच्या कविता देखील यावेळी प्रस्तुत केल्या.

आपल्या बुजुर्ग आणि प्रतिभावान कलाकारांनी आजवर दोन रागांची सांगड घालत जयंत मल्हार, चांदणी मल्हार, मिरा मल्हार, रामदासी मल्हार असे मल्हार तयार केले आहेत. हे मोठाले मल्हार असून एकाच कार्यक्रमात ते शक्यतो एकत्र गायले जात नाहीत. पण एकाच कलाकाराने अशा पद्धतीने एकाच कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करावे आणि या मल्हारांना न्याय मिळावा याबरोबरच एकाच कथेत गुंफत ते रसिकांसमोर सादर व्हावेत या उद्देशाने ‘मल्हार धून’ कार्यक्रम आम्ही घेऊन आलो आहोत अशी माहिती विदुषी देवकी पंडित यांनी दिली.

यावेळी वैभव जोशी आणि देवकी पंडित यांनी ही कथा सांगताना मल्हार रागाच्या अनेक छटा अलगद उलगडून दाखविल्या. यावेळी त्यांनी ‘तेव्हा खरा पाऊस येतो…’, ‘अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी… ‘, ‘आली री सगन घन लागे…’, तेव्हा तुझं आभाळ पाहून गाण्यात रमलो नसतो तर…’ , ‘गडद निळे, गडद निळे जलद भरूनी आले…’, ‘रुप की घटा हो राधे..’, ‘उमड घन गगन आयो रे…’, ‘पाऊस कोसळे हा अंधार हा दिसे…’, ‘पपीहा पिहू पिहू बोले…’ या कविता व रचनांचे सादरीकरण केले. अश्विन श्रीनिवासन यांच्या बासरीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवांदे (संवादिनी), ओंकार दळवी (पखवाज), सुस्मिरता डवालकर व मिरा निलाखे (तानपुरा व गायन) यांनी साथसंगत केली तर डॉ समीरा गुजर- जोशी यांनी या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन केले.

अतुलकुमार उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading