Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

विनिता गेरा बनल्या सीपच्या पहिल्या महिला अध्यक्षा

 

पुणे : पुण्याच्या विनिता गेरा यांची द सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीपच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड घोषित करण्यात आली आहे. विनिता गेरा यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध माहिती तंत्रज्ञान संस्थांमधील कामकाजाचा तब्बल २७ वर्षांचा अनुभव आहे. याबरोबरच शिवराज साबळे यांची उपाध्यक्ष, विद्याधर पुरंदरे यांची सचिव व आनंद रानडे यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ २०२३ ते २०२५ असा दोन वर्षांचा असेल.

विनिता गेरा यांनी पुणे विद्यापीठामधून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम कोलकाता येथून अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. प्रोडक्ट इंजिनिअरिंग, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आदी क्षेत्रात त्यांनी काम केले असून डेल टेक्नोलॉजीज या जागतिक स्तरावर अग्रगण्य अशा संस्थेच्या बंगळुरू व पुण्यातील इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील काही संस्थांच्या संचालक मंडळावर कार्यरत असून काही संस्थांच्या सल्लागार देखील आहेत.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सीपच्या कार्यकारीणीमध्ये नितीन देशपांडे, आशुतोष पारसनीस, रामप्रसाद एस, प्रशांत केएस, अश्विन मेघा, अभिजित अत्रे, स्वप्नील देशपांडे, पराग बर्वे, तुषार शेट्टी व आशिष भंसाळी यांचा समावेश आहे.

१९९८ साली पुण्यातील सॉफ्टवेअर निर्यातदारांची संघटना म्हणून सीपची स्थापना करण्यात आली. विविध सरकारी संस्थांशी संवाद साधणे आणि सदस्य सॉफ्टवेअर कंपन्यांना विविध स्तरावर आवश्यक मदत करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंरच्या दुसऱ्या टप्प्यात २०११ साली ‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमाच्या माध्यमातून स्टार्ट अप संस्कृती रुजवण्याचे विविध उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये सुरुवातीला १० स्टार्ट अप्स इतकी असलेली संख्या २०२९ मध्ये १९० वर पोहोचली. पुणे परिसरातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे १०० संस्था या सीपच्या सभासद आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading