सांस्कृतिक वर्चस्ववादापोटी आदिवासींची पिळवणूक – डॉ. श्रीपाल सबनीस
पुणेः- आदिवासी मूळनिवासी असताना त्यांना परकीय ठरवण्याचे कारस्थान रचले जात आहे. जल, जंगल आणि जमीन यांच्या आश्रयाने हजारो वर्षांपासून आदिम आदिवासी संस्कृती नांदते आहे. त्यांच्या स्वतंत्र जीवनशैलीचा आदर बाळगला गेला पाहिजे. कारण आदिवासींचा धर्म हा निसर्गदत्त आदी मानवता हाच असून विकासाच्या नावाखाली त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायामुळे त्यांची मुळे उखडली जात आहेत. सांस्कृतिक वर्चस्ववादापोटी आदिवासींची पिळवणूक होत आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर, नागपूरचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. वि.स. जोग, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम, विदिशा विचार मंच, पुणेच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. भौमिक देशमुख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संभाजी मलघे, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे सचिव सुनील कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अनोख्या पद्धतीने या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रा. डॉ. विनायक तुमराम लिखित ‘रानवादळातील दिवेलागण’ या ग्रंथाचे आणि कवी रामचंद्र जंगले, ठाणे,यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर उलगुलान या शब्दाचे प्रतीक असलेली मशाल आणि हाकुमी हे आदिवासी वाद्य हातात देऊन पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांच्याकडे संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, नक्षलवादी आणि पोलीस यांच्या दहशतीत आदिवासींचा वनवास चालू आहे. त्यांना मध्यवर्ती प्रवाहात सामील करून घ्यायला हवे. यासाठी कला, साहित्य, निसर्ग आणि निसर्ग प्रेमाचा आदिवासींचा वारसा जपला पाहिजे, कारणे ते आपल्यापेक्षा समृद्ध आहेत. त्यामुळे आदिवासी संस्कृतीला उज्वल भवितव्य प्राप्त करून देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यावर बेगडी संस्कृती लादण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. त्यांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून तोडले जात असून त्यांना त्यांचे मानवतेचे तत्व सोडण्यास भाग पाडले जात आहे. नागरी संस्कृतीने शिकावी, अशी आदिवासींची मूळ संस्कृती आहे.
यावेळी बोलताना प्रा. विश्वास वसेकर म्हणाले की, ‘उलगुलान’ हा मुंडारी भाषेतला शब्द असून थोर क्रांतिसेनानी बिरसा मुंडा यांनी दिलेला तो क्रांतीचा उद्गार आहे. भारतीय संविधानाने या देशातील तळागाळातला, दर्याखोर्यांतला, जंगला- रानातला माणूस जागा झाला. भारतीय राज्यघटनेने या देशातल्या आदिवासी – दलित आणि भटक्या विमुक्तांना खऱ्या अर्थाने माणूसपण बहाल केले. मात्र, धूर्त, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत अजूनही नीट पोहचू दिले नाही. आदिवासी साहित्य, भटक्या विमुक्तांचे साहित्य या केवळ संज्ञासंकल्पना राहिल्या नाहीत तर त्यांना नव्या वाङ्मयीन जाणिवांचे रूपडे प्राप्त झाले आहे. त्या नव्या वाङ्मयीन प्रवृत्ती बनल्या. कथा, कादंबरी, कविता, नाटक यांमधून त्या आविष्कृत व्हायला लागल्या आहेत, त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे.
यावेळी बोलताना आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम म्हणाले की, आदिवासी लेखकांना हक्काचे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात येते. आदिवासीएतर कोणत्याही साहित्य प्रवाहाला आमचा विरोध नसनू आमची कोणाशीही स्पर्धा नाही. आदिवासींची वेदना आणि शोषण त्यांच्या साहित्यातून पुढे यावे, म्हणून ही धडपड सुरू आहे. आदिवासी हा या भूमीचा मूळ पुरूष असून त्यालाच आज हद्दपार केले जात आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आदिवासींचे योगदान दुर्लक्षले गेले, याची खंत न बाळगता आदिवासींनी त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान कायम जागृत ठेवला. अस्मिता आणि अस्तित्वासाठी आम्ही झगडत आहोत. इतर सर्व धर्मीयांसाठी कायदे आहेत, मात्र आदिवासींसाठी एकही कायदा नाही. त्यामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. वि.स. जोग म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सरकारकडून भरघोस निधी दिला जातो, ही आनंदाची बाब असली तर आदिवासी साहित्य संमेलनाला अशा प्रकारची मदत सरकारकडून मिळत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. सरकारी पातळीवरून होणारा हा दुजाभाव खेदजनक आहे.
यावेळी विदिशा विचार मंच, पुणेच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी हे संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे सचिव सुनील कुमरे यांनी केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संभाजी मलघे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले, तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. भौमिक देशमुख यांनी आभार मानले.
संमेलनाच्या उद्घाटनानंतर ‘आदिवासी प्रतिभावंतांमधील वैचारिक अंतर्विरोध किती घातक किती पोषक?’ या विषयावर परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन झाले.
