Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

आम्हालाही आता इंग्रजी थोडे थोडे वाचता येते… देहविक्री करणा-या महिलांच्या भावना

पुणे : मराठी थोडे फार बोलता येत होते. मात्र, इंग्रजी अक्षरे माहितच नव्हती. लहान असताना शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने शिकू शकलो नाही. आता शिकू आनंदे मध्ये इंग्रजी भाषा शिकतोय. यामुळे बसवरील आकडे, रस्त्यावरील पाटया आणि टिव्हीवरील इंग्रजीतील शब्द वाचायला यायला लागले असल्याचे सांगत देहविक्री करणा-या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवीन भाषा शिकत असल्याचा आनंद एकीकडे तर, शिक्षण घेताना येत असलेले अनुभव सांगताना काहींना आनंदाश्रू देखील अनावर झाले.

निमित्त होते, बुधवार पेठेतील देहविक्री करणा-या महिलांसाठी मैत्र युवा फाऊंडेशन व सहेली संस्थेतर्फे आयोजित शिकू आनंदे या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीचे. बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोरील मांगल्य मंगल कार्यालयात झालेल्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला प्रख्यात साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, सहेली संघाच्या अध्यक्षा महादेवी मादर, तेजस्वी सेवेकरी, मैत्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, इंग्रजी वर्गाच्या प्रशिक्षीका ॠतुजा बर्वे आदी उपस्थित होते.

डॉ.संगीता बर्वे म्हणाल्या, प्रत्येकाला लिहिता आणि वाचता यायला हवे. शिकणे हे सर्वात मोठे काम आहे. देहविक्री करणा-या महिला दुनियेच्या शाळेत खूप शिकल्या आहेत. मात्र, आता भाषेचे शिक्षण घेऊन अधिकाधिक समृद्ध होत चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता मैत्र युवा आणि सहेली संघ करीत असलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्यामध्ये असलेली ही जाणीव समाजात सर्वत्र असायला हवी.

तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, इच्छा असूनही शिक्षण घेऊ न शकलेल्या देहविक्री करणा-या वस्तीतील महिलांसाठी शिकू आनंदे हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यामध्ये या महिलांना शिक्षणासोबत लेखन, इंग्रजी वाचन व इतर कौशल्ये शिकविण्यात येत आहे. या महिला प्रत्यक्षपणे पाटी-पेन्सिल घेऊन लेखन करीत असल्याचे दृश्य आशादायी आहे.

संकेत देशपांडे म्हणाले, मागील एका वर्षापासून हा उपक्रम सुरु असून वस्तीतील अनेक महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत. दर गुरुवारी हा वर्ग भरविण्यात येत असून त्यामध्ये महिलांना इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले जाते. आता दुस-या टप्प्यामध्ये इंग्रजी भाषेच्या शिक्षणासोबतच नृत्य आणि पुढील टप्प्यात गायनाचे धडे देण्याचा आमचा प्रयत्न आहेत. यामाध्यमातून महिलांमधील कलागुणांना देखील वाव मिळेल. समाजातील तरुणाई यामध्ये सहभागी होत असून महिलांकरिता काम करीत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading