पुनररमूल्यांकनाच्या निकालाआधीच परीक्षेची तारीख जाहीर-पुणे विद्यापीठाचा प्रताप.
पुणे- पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयाच्या अनेक विभागांमध्ये गेल्या सत्राच्या फेरमूल्यांकनाचा निकाल अद्याप आला नाही. अशातच विद्यापीठाने त्याच विषयांच्या परीक्षेचे नियोजन जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील सत्र 5 व 6 च्या परीक्षा झाल्या. त्या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी रीतसर शुल्क भरून अर्ज केले. अद्याप त्या फेरतपासणीचा निकाल प्रलंबित आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतिसाठी अर्ज केले. काहींना ते उपलब्ध झाले. मात्र गुणांमध्ये तफावत वाढल्याने फेरमुल्यांकनासाठी अर्ज भरला. मात्र विद्यापीठाकडून या बाबत काहीच कार्यवाही न होता थेट परीक्षेचीच तारीख जाहीर झाली. यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले असून पुनरमूल्यांकनची वाट पहावी की परीक्षेला बसावे अशी द्विधा मनस्थिती झाली आहे.
विद्यापीठातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात प्राध्यापकांच्या अनुपलब्धीमूळे हा प्रकार घडत आहे. त्यातच विद्यापीठात G-20 परिषद होत आहे. त्यामुळे बहुतांशी प्राध्यापक-कर्मचारीवर्ग त्याच्या आयोजनात गुंतला आहे. त्यामुळे ही परिक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. गोसावी सर याची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकार घडला असल्याचे मान्य केले. ज्या विद्यार्थ्यांनी पुनरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते, त्यांनी परीक्षा दिल्यास त्यांचे दोन्ही परीक्षेत जे सर्वोत्तम गुण असतील तेच ग्राह्य धरले जातील. तसेच त्यांची परीक्षा शुल्क देखील परत करणार असून निकालपत्रावर पुनरमूल्यांकन दर्शवणारी कोणतीही चिन्हे टाकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या अशा कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठात G-20 परिषद आयोजित होत आहे ही चांगली गोष्ट आहे, मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असुन विद्यार्थांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत आम्ही कुलगुरूंना अर्ज दिला असून यावर येत्या 7 दिवसात तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी विक्रम जाघव शुभम माताले,श्रीकांत बालघेर,ओंकार बेनके ऋषी कडू,अजय पवार,साहिल कांबळे,सत्यम पासलकर,दीपक शेगर,जयदीप देवकुळे, उपस्थित होते
