सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे तर्फे ‘स्किल बिल्डर’ कार्यशाळा संप्पन
पुणे : सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी (एसओईस) संचलित सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे तर्फे नुकतेच इयत्ता ९ वी, १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवशीय ‘स्किल बिल्डर्स’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यशाळा ही सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या मुख्य सभागृहात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी करिअरचे योग्य नियोजन कसे करावे, तसेच स्टार्ट अप प्लॅनिंग, मेकॅनिक्स, चॅटजीपीटी,वेबसाइट डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती यांसारख्या विषयांवर विशेष तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ३३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेचे उदघाटन सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आणि सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या भावना नरसिंगोजू उपस्थित होत्या. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण, हँड्स-ऑन ट्रेंनिंग, विविध प्रात्यक्षिके अनुभवता आली. विद्यार्थ्यांपर्यंत विविध कौशल्ये पोहचावी आणि त्यांच्या कल्पनांना वाव मिळावा हा या कार्यशाळेच्या मुख्य उद्देश होता.
सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि व्यावसायिक विकासासाठी कौशल्य शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि नव्याने बदलत चाललेल्या रोजगारांच्या गरजांसाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्त्मसात करणे गरजेचे आहे. केवळ तांत्रिक कौशल्यांवर भर न देता संवाद कौशल्ये, सांघिक कार्य यासारख्या सॉफ्ट स्किल्सवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.
याप्रसंगी डॉ. स्वाती मुजुमदार यांनी भारताच्या ‘स्किल इंडिया’ या मोहिमेची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्किल बिल्डर उपक्रमामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर यांनी कौशल्य आणि उच्च शिक्षणाविषयी आपली मते मांडली. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे किंवा ठरवलेले ध्येय गाठण्याची क्षमता त्याच्यात आहे. या नवीन युगातील कौशल्ये आत्मसात करून प्रत्येकजण आपले ध्येय सहज कसे साध्य करू शकतो आणि आपले स्वप्न कश्याप्रकारे साकार करू शकतो या बद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या भावना नरसिंगोजू ह्यांनी आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने त्यांचे कौशल्य संच सतत वाढवले पाहिजे आणि नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत याची गरज अधोरेखित केली.
