Parbhani – आमदार मेघना बोर्डीकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्री व सचिवांची भेट
परभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील पहिले अपील फेटाळल्यानंतर आता दुसरे अपील राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेकडे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दाखल केले असून या संदर्भात आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह सहसचिवांचीही भेट घेतली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार बोर्डीकर यांनी सांगितले. चालू वर्षात प्रवेश प्रक्रिया होण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही त्या म्हणाल्या.
परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात अपील फेटाळल्यानंतर दुसरे अपील लगेचच दाखल करण्यात आले. या अपीलानंतर छाननी होऊन केंद्रीय समिती तपासणीसाठी येईल. त्यात कोणत्याही त्रुटी राहिल्या नाहीत असे या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान गुरुवारी (दि.8) आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया, आरोग्य खात्याचे सहसचिव डॉ. सचिन मित्तल यांची भेट घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे हे ही उपस्थित होते. 2 कोटी 27 लक्ष रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे खाते उघडण्यासाठीचा पाठपुरावा केला आहे. खाते नसल्याने आलेला निधीही मागच्या वर्षी वापरता आला नव्हता, आता तो वापरता येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी अर्थसंकल्पात दिलेला 70 कोटी रुपयांचा निधी यावर्षी परत जाणार नाही असे त्या म्हणाल्या.
वैद्यकीय महाविद्यालयातील 448 पदांबरोबरच रुग्णालयातील 1032 पद निर्मितीसाठी सुद्धा पाठपुरावा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांचे या कामी व्यक्तिगत लक्ष आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष हातून जाणार नाही ह्याची खात्री आहे असा विश्वासही आमदार बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
