पोटनिवडणूक बिनविरोध करावी राज ठाकरेंचे आवाहन
मुंबई : आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यातच राज ठाकरेंनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन सर्वपक्षीयांना केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे राज ठाकरेंनी हे आवाहन केले आहे.
कसबा मतदारसंघात हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंतची परंपरा पाहता लोकप्रतिनिधींचे निधन झाले की, त्या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमदेपणा भाजपने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावा, असेही त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचे नुकतेच दु:खद निधन झाले. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानुभूती दाखवेलच असे नाही, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली, असे म्हणत त्यांनी सर्वपक्षीयांना अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळची आठवण करून दिली.
