माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची पत्नीला मारहाण
मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने आपल्याला मारहाण केली, असा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. या प्रकरणी विनोद कांबळीवर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
विनोद कांबळी याने तव्याचे हँडल फेकून मारले त्यामुळे इजा झाल्याचे कांबळीच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार विनोद दारू पिऊन घरी आला होता. घरात येताच त्याला पत्नीने हटकले. त्यामुळे त्याला राग आला. मग स्वयंपाकघरात जाऊन त्याने तव्याचे हँडल आणले आणि मला फेकून मारले, असा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी विनोदला अद्याप अटक झालेली नाही.
यापूर्वी देखील विनोद कांबळीला पोलिसांनी अटक केली होती. क्रिकेटपटू विनोद कांबळी याला दारूच्या नशेत कार चालवताना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या कृत्यानंतर त्याने दारू पिऊन गेटवरील चौकीदार आणि त्या सोसायटीत राहणा-या काही लोकांशी वाद घातला होता. त्यानंतर कांबळीची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
