विवाहितेची 11व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या; हडपसर येथील उच्चभ्रू सोसायटीतील घटना 

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने 11व्या मजल्यावरील बिल्डिंगच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्या कानडे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी उच्चशिक्षित पतीसह निवृत्त प्राध्यापक असलेल्या सासर्‍याला अटक केली आहे. 

तरुण कानडे (वय ३०), मदन कानडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सासू सपना कानडे, अरुण कानडे (सर्व रा. नवरत्न एक्झोटिका सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शामराव आनंदा बनसोडे (वय ५०, रा. धानेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या हिचा विवाह २१ जानेवारी २०२१ रोजी तरुण कानडे याच्याशी झाला होता. तरुण कानडे हा MBA झालेला असून पुण्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. त्याचे वडिल मदन कानडे औरंगाबादमधील महाविद्यालयात प्राध्यापक होते. विवाहानंतर गेल्या दिवाळीपासून दिव्याचा छळ सुरु झाला. लग्नात मानपान केला नाही, म्हणून तिच्याकडे पैशांची व सोन्यांच्या दागिन्यांची मागणी केली जाऊ लागली. तिच्या वडिलांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी येऊन विचारणा केल्यावर त्यांना मात्र आमची कोणतीही मागणी नसल्याचे सांगितले. त्यानंतर दिव्याचा छळ कमी झाला नाही. या छळाला कंटाळून तिने राहत्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील टेरेसवरुन सोमवारी सकाळी साडेसात वाजता उडी मारुन आत्महत्या केली.

 

Leave a Reply

%d bloggers like this: