‘अभंगवाणी’तून रसिकांना स्वरसुखाची अनुभूती

पुणे : राजस सुकुमार मदनाचा पुतळा… तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल… राधाधरमधुमिलिंद जयजय… अवघाची संसार सुखाचा करीन… अशी विविध नाट्यगीते, अभंग आणि भजने सादर करीत पं. आनंद भाटे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून स्वर्गीय अनुभूती रसिकांना दिली. अभंगवाणी या स्वरमैफलीने द्वादश श्रीविष्णु याग या सहा दिवसीय सोहळ्याची सांगता पुण्यामध्ये मोठया उत्साहात झाली.

ग्रंथ पारायण दिंडी तर्फे द्वादश श्रीविष्णु याग सांगता कार्यक्रमांतर्गत १२ व्या विष्णु पंचायतन याग सोहळ्याचे आयोजन मुकुंदनगरमधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाजवळ असलेल्या श्री दौलत राम मंदिर प्रांगणात करण्यात आले होते. याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत कीर्तन, प्रवचन व गायनाचा कार्यक्रम देखील पार पडला. पं. आनंद भाटे यांच्या गायनसेवेच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सुरेल सांगता झाली. यावेळी आयोजक विरेंद्र कुंटे, नंदकुमार देव, जयश्री देव, वसुधा दातार, द्वारकानाथ ऊंडे, राहुल भाटे आदी उपस्थित होते. श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेने सोहळ्याला सहकार्य केले.

अभंगवाणी कार्यक्रमाची सुरुवात जय जय राम कृष्ण हरीच्या गजराने झाली. त्यानंतर पं.भीमसेन जोशी यांनी गायलेला आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला रूपाचा अभंग ‘ राजस सुकुमार मदनाचा पुतळा ‘ या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संगीत सौभद्र नाटकातील राधाधरमधुमिलिंद जय जय हे नाट्यगीत, पं. भीमसेन जोशी यांच्या संतवाणीतील गाजलेला अभंग ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ हा संत ज्ञानेश्वर रचीत अभंग सादर केला. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद धर्म अमंगळ’ हा अभंग बालगंधर्वांनी गायलेल्या चालीत गाऊन उपस्थितांची दाद मिळवली. ‘टाळ बोले चिपळीला’ आणि त्यानंतर झालेल्या पांडुरंगाच्या गजराने वातावरणात चैतन्य निर्माण केले. ‘जो भज हरी को सदा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता केली.

दररोज सकाळी त्या त्या देवतेचे यागाप्रमाणे ११ हजार पुष्पअर्चन आणि सायंकाळी चार वेदांचे मंत्रजागर झाले. याशिवाय सामुहिक विष्णुसहस्त्रनाम पठण, पुण्याहवाचन, गणेश याग, गणेश अर्चना, विष्णुयाग, महारुद्र स्वाहाकर, सौरसूक्त मन्यु – सूक्त स्वाहाकर, नवचंदी याग आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. याशिवाय राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, कीर्तनकार संज्योत केतकर यांचे कीर्तन, प्रणव गोखले यांचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याविषयावरील प्रवचन झाले.

Leave a Reply

%d bloggers like this: