Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

तब्बल पाचशे पुस्तकांचा नैवेद्य गणराया चरणी अर्पण करून माहेर संस्थेला पुस्तकांची भेट

पुणे : प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे मुलांनी चांगले शिक्षण घेताना स्पर्धापरीक्षेची तयारी करून उत्तुंग यश मिळवावे, यासाठी शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने माहेर संस्थेतील स्पर्धापरीक्षेची तयारी करणा-या मुलांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्यात आली. तब्बल ५०० पुस्तकांचा हा नैवेद्य गणरायाच्या चरणी अर्पण करून त्यानंतर माहेर संस्थेला देण्यात आली.

सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने माहेर या संस्थेत मधील गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी व पूर्वतयारीसाठी आवश्यक असणाऱ्या ५०० पुस्तकांचा संच देण्यात आला. त्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आले. यावेळी निवृत्त पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, माहेर संस्थेच्या हिराबेगम मुल्ला, शाहीर हेमंत मावळे, सुभाष मोहिते, विश्वास भोर, डॉ मिलिंद भोई, राजेंद्र पायमोडे, प्रशांत मते, नितीन पंडित, पियुष शहा, कुमार रेणुसे, सागर पवार, किरण सोनिवाल, प्रशांत खंडाळे,अमित जाधव, उमेश सपकाळ, नवले, मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे, संदिप गायकवाड, शिरीष मोहिते उपस्थित होते. विशाल मोहिते यांच्या वतीने पुस्तके देण्यात आली.

चंद्रशेखर दैठणकर म्हणाले, सेवा मित्र मंडळाच्या वतीने समाजातील गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सतत नवनवीन उपक्रम राबवून त्यांना मदत करण्यात येते. माहेर संस्थेतील मुलांनी पुस्तकांचा उपयोग करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा आणि चांगले यश मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिरीष मोहिते म्हणाले, माहेर सारख्या संस्था मुलांचे जडण-घडण करून त्यांना घडविण्याचे काम करतात. यातील अनेक मुलांना अभ्यासाची आणि पुढे शिकण्याची इच्छा असते. परंतु प्रत्येकालाच पुस्तके घेणे जमतेच असे नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माहेर संस्थेतील मुलांना ही पुस्तके देण्यात आली. संस्थेतील पंधरा ते वीस मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यामुळे त्यांना ही पुस्तके उपयुक्त ठरतील असेही त्यांनी सांगितले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading