सरदार भगतसिंग यांच्या मूळ छायाचित्राचे पुणेकरांतर्फे पूजन व अभिवादन
पुणे : भारत माता की जय… हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरु अमर रहे… च्या घोषणा देत पुणेकरांनी भगतसिंग यांच्या मूळ छायाचित्राचे पूजन केले. भगतसिंग यांच्या आईने इन्कलाब कादंबरीच्या लेखिका मृणालिनी जोशी यांना भेट दिलेल्या भगतसिंग यांच्या मूळ छायाचित्राचे पूजन त्यांच्या ९१ व्या या स्मृतिदिनी करण्यात आले. ब्रिटीशांनी दिनांक २३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन महान देशभक्तांना फाशी दिले होते. त्यामुळे बुधवारी ७ वाजून ३३ मिनिटांनी राष्ट्रगीत गाऊन पुणेकरांतर्फे या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.
निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळ आणि सेव्ह हरिटेज यांच्यावतीने बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि हायस्कूलच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमाचे. इतिहास अभ्यासक व इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी कथाकथनातून या क्रांतिवीरांचा जीवनपट उलगडला. कार्यक्रमाला सेव्ह हेरिटेज चे स्वप्निल नहार आदी उपस्थित होते. यापूर्वी फरासखाना पोलिस चौकीसमोर क्रांतिकारक कट्टा येथील हुतात्मा स्मारकास मानवंदना देण्यात आली.
मोहन शेटे म्हणाले, भगतसिंग यांचा जन्म एका देशभक्त कुटुंबात झाला. त्यांचे काका अजितसिंह तमेच पुण्याजवळच्या तळेगाव ढमढेरेचे विष्णु गणेश पिंगळे हे त्यांचे प्रेरणास्थान होते. जालियनवाला येथील राक्षसी हत्याकांडाने ते पेटून उठले आणि त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. चंद्रशेखर आझाद सेनापती असलेल्या हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चे ते सभासद बनले. शिवराम हरी राजगुरू यांचे बालपण पुण्यात केसकर विठ्ठल मंदिरात गेले, ते काशी येथे शिकत असताना बाबाराव सावरकर यांच्यामुळे त्यांची आझादांशी ओळख झाली व ते क्रांतीकार्यात सहभागी झाले. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी राजगुरू व भगतसिंग यांनी सॉंडर्स या इंग्रज अधिका-याचा वध केला. दुर्गाभाभींच्या सहकार्यामुळे वेशांतर करून पळून जाण्यात ते यशस्वी झाली.
ते पुढे म्हणाले, अन्यायकारक कायद्यांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट केला. अखेर २३ मार्च १९३१ रोजी सायं ७ वाजून ३३ मिनिटांनी लाहोर कारागृहात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी देण्यात आले.
पंजाबमधून पुण्यात कसे आले भगतसिंग यांचे मूळ छायाचित्र?
भगतसिंग यांच्या जीवनावर ‘इन्कलाब’ ही कादंबरी लिहण्यापूर्वी अभ्यास करण्यासाठी मृणालिनी जोशी सन १९७० च्या सुमारास पंजाबमध्ये भगतसिंग यांच्या घरी गेल्या होत्या. भगतसिंग यांची आई विद्यावती देवी व बहिण अमृतकौर यांच्या बरोबर तीन दिवस राहून या क्रांतिकारकांच्या असंख्य आठवणी त्यांनी मिळवल्या. त्यांच्या घरी भगतसिंग यांचा जो फोटो होता, त्याभोवती त्यांच्या बहिणीने कशिदाकाम केले होते. महाराष्ट्रातल्या मुलांना प्रेरणा मिळावी, म्हणून ती अनमोल फोटोफ्रेम त्यांनी जोशी यांना भेट दिली. भावी पिढीसमोर आदर्श रहावा म्हणून हे छायाचित्र जोशी यांनी नूमवि प्रशालेस भेट दिले असल्याची आठवण मृणालिनी जोशी नेहमी सांगतात.
