एमआयएमचा हा कट उधळून लावा अन् शिवसेनेच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहचवा – उद्धव ठाकरे
मुंबई : सध्या आपल्याल बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे. विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीने आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे. एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेली ऑफर हा कट आहे. एमआयएमचा हा कट उधळून लावा व शिवसेनेच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहचवा, असे आदेश मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारा व जिल्हा प्रमुखांसोबत ऑनलाईन संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांची हवा पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत आहेत. यूपीमध्ये भाजपचे आधीपेक्षा आकडे कमी झाले आहेत, हे लक्षात ठेवावं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या 12 आमदारांच्या फाईलवर अद्याप निर्णय नाही. हे लोकशाहीला न पटणारं आहे. आता आपण घराघरात जाणार आहोत, आपलं कामं लोकांना सांगा, आपण घेतलेलं निर्णय घराघरात पोहोचवा असे ठाकरे यावेळी म्हणाले.
ते मेहबुबा मुफ्तीसोबत संसार करत होते
एक वेळ अशी होती की, ते मेहबुबा मुफ्तीसोबत संसार करत होते. आता ते आपल्याला बोलत आहेत. आपल्याला अनेक ॲाफर येत आहेत, पण आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत. महाविकास आधाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. याआधी काही जणांनी घात केल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
