पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा – वॉरियर्स, ऑल स्टार्सचा विजय
पुणे : वॉरियर्स, ऑल स्टार्स, माव्हरिक्स, टायफून्स या संघांनी पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत वॉरियर्स संघाने जेट्स संघावर १९ धावांनी मात केली. वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत ६ बाद ६५ धावा केल्या. जेट्स संघाला ४ बाद ४६ धावाच करता आल्या. वॉरियर्स संघाचा हा तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. यानंतर माव्हरिक्स संघाने सेलर्स संघावर सात गडी राखून मात केली.
सेलर्सने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल माव्हरिक्सने विजयी लक्ष्य एका गडीच्या मोबदल्यात ४.२ षटकांतच पूर्ण केले. यात किरण देशमुखने १६ चेंडूंत ४१ धावांची खेळी केली. माव्हरिक्सचा हा तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. ‘ब’ गटात माव्हरिक्स चार गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. यानंतर टायफून्स संघाने वेन्डेकिन ईगल्स संघावर आठ गडी राखून सहज विजय मिळवला. टायफून्सचा हा सलग तिसरा विजय ठरला.
टायफून्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून वेन्डेकिन संघाला ४ बाद ४७ धावांतच रोखले. यानंतर टायफून्सच्या अश्विन शाह, अभिजित गानू या सलामी जोडीने विजयी लक्ष्य ४.१ षटकांतच पूर्ण केले. ऑल स्टार्स संघाने जेट्स संघावर सात गडी राखून विजय मिळवला. जेट्सने दिलेले ४८ धावांचे लक्ष्य ऑल स्टार्स संघाने एका गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. ऑल स्टार्स संघाचा हा दुसरा विजय असून, चार गुणांसह संघ ‘अ’ गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
