जुन्या दरातील गॅस सिलेंडर जुन्या दरानेच वितरीत करावे
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांची मागणी
पुणे : रशिया व युक्रेनच्या दरम्यानचा संघर्ष आणखी चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने आजपर्यंत कच्चे तेल १४० डॉलर प्रतिबॅरल पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे देशातही लवकरच म्हणजेच काही राज्यातील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल / डिझेल त्याचप्रमाणे घरगुती व व्यापारी गॅस सिलिंडरमध्येदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या वितरकांकडे सिलेंडर आहेत. त्यांनी जुन्या दरातील गॅस सिलेंडर जुन्या दरानेच वितरीत करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांवर प्रचंड आर्थिक बोजा पडू शकतो. आधीच सर्वच दैनंदिन वस्तूंचे किमतीत गेले काही काळात वाढ झाल्यामुळे सामान्य माणसाचे आर्थिक वेळापत्रक कोलमडून पडले आहे. त्यामुळे जुन्या खरेदीचीच्या सिलेंडर्सची विक्री जुन्या दरानेच करण्याच्या सूचना वितरकांना देऊन सर्वसामान्य घरगुती वापर करणार्या ग्राहकांना ही सुविधा मिळवून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
