Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विद्यापीठातील हेरिटेज वॉकला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरु केलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाला गुरुवारी नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. कोव्हिडमुळे काही काळ कमी झालेली विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा अनुभवायला मिळाली.

कोव्हिड काळामुळे अनियमित झालेला ‘हेरिटेज वॉक’ चा उपक्रम गुरुवारी १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यापीठात पुन्हा सुरू झाला. दत्तो वामन पोतदार संकुल येथून सकाळी ११.३० च्या सुमारास या हेरिटेज वॉकची सुरुवात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र कुलगुरू प्रा.एन.एस.उमराणी आणि कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उपस्थित नागरिकांना इतिहास विभागातील प्रा. श्रद्धा कुंभोजकर, प्रा.बाबासाहेब दूधभाते, मानवशास्त्र विभागप्रमुख डॉ.शंतनू ओझरकर तसेच संशोधकांनी मार्गदर्शन केले.

यंदाच्या वर्षी विद्यापीठातील ऐतिहासिक मुख्य इमारतीला १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या इमारतीत असणाऱ्या दुर्मिळ चित्रांचा वारसादेखील विद्यापीठाने जतन केला आहे. अठराव्या शतकात जेम्स वेल्स या चित्रकाराने महादजी शिंदे, नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचे चित्र काढले होते. हे चित्र त्यावर योग्य रासायनिक प्रक्रिया करून पुन्हा मूळ स्वरूपात आणले असून मुख्य इमारतीत प्रदर्शित केले आहे. या हेरेज वॉकच्या निमित्ताने आज प्रथमच हे जतन केलेले चित्र सर्वांना पाहता आले.

यावेळी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनची माहिती दिली. तसेच विद्यापीठाकडून पुढील काळात हा वारसा जपला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान प्रत्येक महिन्यातून दोनदा ठराविक वेळेत नागरिकांसाठी हा ‘हेरिटेज वॉक’ घेण्यात येणार असून याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading